आमदार साळवींच्या घराचे पुन्हा एसीबीकडून मोजमाप

रत्नागिरी:- ठाकरे गटाचे उपनेते आणि लांजा-राजापूर मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांच्या नव्या घराचे पुन्हा एसीबीकडून मोजमाप करण्यात आले. वारंवार होणाऱ्या या चौकशीमुळे साळवी कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी साळवी यांच्या घराची मोजमाप नोंदवून घेतले. याबाबतच अहवाल रायगड एसीबीला पाठवला जाणार आहे. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ठाकरे गटाचे उपनेते आमदार राजन साळवी यांची चौकशी सुरू आहे. आमदार साळवी यांच्या पीएससह सोबत असणाऱ्या ठेकेदारांचीही चौकशी करण्यात आली. दरम्यान, लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार रत्नागिरीतील बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी गेल्या सोमवारी प्रथम तेलीआळी येथील आमदार साळवी यांच्या जुन्या घराची व हॉटेलची मोजमाप घेतली होती.
आज पुन्हा एसीबीच्या आदेशावरून त्यांच्या खालचीआळी परिसरातील नव्या घराचीही मापे बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली. सुमारे तास ते दीड तास ही प्रक्रिया सुरू होती. याचा अहवाल बांधकाम विभाग एसीबी रायगडला पाठवणार आहे; मात्र या वारंवार होणाऱ्या चौकशीमुळे साळवी कुटुंब हैराण झाले आहे.