आमदार वैभव नाईक यांच्या मतदार संघातील सरपंच, ठेकेदारांची एसीबीकडून चौकशी

रत्नागिरी:- शिवसेना ठाकरे गटाचे कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांची सध्या मालमत्ता प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून आ. नाईक यांच्या मतदारसंघातील भरणी सरपंच आणि ठेकेदार यांची रत्नागिरीतील लाच लुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे चौकशी करण्यात आली. आ. नाईक यांच्या आमदार फंडातून ज्या कामाना निधी वितरीत करण्यात आला होता त्या अनुषंगाने ही चौकशी होती.

यामध्ये कुडाळ तालुक्यातील भरणी ग्रामपंचायतीमध्ये आम. नाईक यांच्या आमदार फंडातून ज्या कामांना निधी वितरीत करण्यात आला होता, त्या झालेल्या कामांची चौकशी करण्यासाठी भरणीच्या विद्यमान सरपंच अश्विनी मिस्त्री लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून रत्नागिरी येथे चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती अश्विनी मिस्त्री यांनी त्यांच्याकडे मागितलेली सर्व कागदपत्रे सादर केली. यामध्ये भरणी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील देवूळवाडी येथे आ. नाईक यांच्या आमदार फंडातून झालेल्या नळ योजना विस्तारीकरण कामाची वर्क ऑर्डर, काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित विभागाकडून मिळालेली मोबदला रक्कम ज्या बँकेच्या खात्याद्वारे प्राप्त झाली त्याचे खाते उतार्यासह अन्य महत्वाची कागदपत्रे घेऊन बोलावण्यात आले होते. याच संबंधातील अन्य दोन ठेकेदारानाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या सर्वांची अर्धा तास चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून सोमवारी करण्यात आली.