राजापूर:- औरंगाबादचे आमदार प्रशांत बंब यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल राजापुरातील एका महीला शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करून तिची औरंगाबाद पोलिसांनी चौकशी केल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. याबाबत राजापुरात उलट सुलट चर्चा रंगत आहेत.
सविस्तर वृत्त असे की, भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत कामचुकार शिक्षकांबद्दल आक्रमक पवित्रा घेत सभागृहात आवाज उठविला होता. त्यानंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत होते. अशातच एका शिक्षक पत्नीने आमदार प्रशांत बंब यांच्याशी उद्दाम आणि शिवराळ भाषेत संभाषण केल्याची ऑडिओ क्लिप संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाली होती. या संभाषणामध्ये “शिक्षक गावात राहत नाहीत मग आमदार म्हणून तुम्ही तरी आपल्या कार्यक्षेत्रात राहता का ? तुम्ही भ्रष्टाचार करता ते चालते का? तुम्ही विधानसभेत भाषण करताना हाय क्लास शिवी घातली होती, असेही त्या महिलेने या व्हिडिओ मध्ये म्हटले आहे. या वेळी त्या महिलेला उत्तर देताना आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या विरोधात एफआयआर दाखल करू शकतो शांत पणे बोला असे म्हटले होते. त्यावेळी महिला म्हणाली तुम्हाला काय करायचे ते करून घ्या आम्ही तुम्हाला घाबरत नाही असे उत्तर देतानाच शिवराळ व बदनामीकारक शब्दात फोनवरून बोलल्या होत्या. एवढेच नव्हे तर ही ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल ही करण्यात आली होती. आमदारांची बदनामी केल्याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस स्थानकात महिला सरपंचाने तक्रार नोंदवली होती. औरंगाबाद पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत त्या क्लिपची संपूर्ण माहिती काढत रत्नागिरी राजापूर तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे नाटे अंतर्गत येणाऱ्या एका गावातील महिलेची चौकशी केल्याचे समजते. औरंगाबाद पोलीस स्टेशनचे एक पथक राजापूर येथे येऊन गेले. महिलेची चौकशी करून पोलिस पुन्हा निघून गेले. त्या शिक्षक पत्नीचे जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. नाटे सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून शीलेगाव (औरंगाबाद ग्रामीण ) स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत असे सांगितले.
यावेळी पोलिसांनी सांगितले की, लोकप्रतिनिधीना जाब विचारायला हवा. परंतु अर्वाच्य भाषा, अश्लील शिवीगाळ, असभ्य वर्तन करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर बदनामी करणाऱ्यांवर कारवाई केलीच पाहिजे असेही बोलले जात आहे.