आपले पंचनामे करुन भरपाई मिळवा; पीकहानी पंचनाम्यासाठी नवे संकेतस्थळ

रत्नागिरी:- कृषी हानीत पंचनामा करण्याची किचकट प्रक्रिया टाळून आता शेतकर्‍याला स्वतः आपल्या कृषीहानीचे पंचनामे करणे शक्य झाले आहे. यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने  माझे पीक, माझा पीकस्थिती अहवाल या संकेतस्थळावर  शेतकर्‍यांना स्वतः आपले पंचनामे करण्याची आणि भरपाई मिळविण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. 

कोकणात अनिश्चित पावसावर अवलंबून खरिपाची शेेती केली जाते. मात्र, त्यामुळे अनेकदा नैसर्गिक आपत्तीचा सामाना करावा लागतो. अशा स्थितीत पीकहानी होते. मात्र, भरपाईसाठी प्रतिक्षाच करावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळ उपलब्ध करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना आता पीक नुकसानीचे ऑनलाइन अहवाल शासनाला पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यामध्ये पिकाचे 75 टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झाल्यास शेतकर्‍याला 15 हजार रुपयांपर्यंतची त्वरीत भरपाई दिली जाईल. अनेकदा शेतात पंचनामे करायला कोणी येत नाही. यामुळे अडचणी निर्माण होतात. यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहतात. मात्र, आता या निर्णयाचा शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. तसेच त्यामुळे महसूलसह कृषी विभागावर येणारा ताणही कमी होणार आहे. 

अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्ती या प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणार्‍या संकटाचा फटका सर्वात आधी शेतकर्‍यांना बसतो. ऐन खरीपात ही स्थिती उद्भवल्याने  शेतीचे नुकसान होते. अशा स्थितीत आता केंद्र शासनाने शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळ उपलब्ध केले आहे. माझे पीक, माझी पिकस्थिती अहवाल या संकेतस्थळावर थेट शेतकरी आपल्या नुकसानीचा पंचनामा करुन मदतीसाठी  प्रस्ताव पाठवू शकतो. ही सुविधा लवकरच कोकणातील शेतकर्‍यांना प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.