आपत्ती सौम्यीकरणासाठी जिल्ह्याचा जम्बो आराखडा

नवीन २६ धोके निवारा केंद्र, भूमिगत वाहिन्यांचा २०० कोटीचा प्रकल्प

रत्नागिरी:- भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी वित्त व जीवितहानी टाळण्यासाठी आपत्ती सौम्यीकरणाचा जिल्ह्याचा जम्बो आराखडा प्रशासनाने शासनाला सादर केला आहे. यामध्ये नव्याने २६ चक्रीवादळ धोके निवारा केंद्र, किनारी भागातील भूमिगत विद्युतवाहिनीचा २०० कोटीचा प्रकल्प, ५८ धूपप्रतिबंधक बंधारे, १५४ वीज अटकाव यंत्र, ८३ ठिकाणी आपत्ती पूर्वसूचना प्रणाली उभारणे आदींचा समावेश आहे.

फयान, निसर्ग, तौक्ते चक्रीवादळानंतर २२ जुलैच्या जलप्रलयाने वारंवार निसर्गाचा कोप होत राहणार, हे अधोरेखित झाले आहे. भविष्यातील या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाला नुकतीच तत्वतः मान्यता देण्यात आली. पाच वर्षांत सुमारे ३ हजार ६३५ कोटी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आराखडा तयार करून पाठविण्याच्या सूचना शासनाने केल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने यामध्ये कोणताही विलंब न करता जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा सर्वांगाने विचार करून कोट्यवधीचा जम्बो आराखडा तयार केला आहे. किनारपट्टीवर भविष्यात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास किनारपट्टी भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने चक्रीवादळ धोके निवारा केंद्र उभारण्यावर भर दिला आहे. यापूर्वीचे प्रस्ताव अजून प्रलंबित असले तरी जिल्ह्यात नव्याने २६ धोके निवारा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. एक केंद्र सुमारे अडीच ते तीन कोटीच्या दरम्यान आहे. यामध्ये मंडणगड तालुक्यात ३, दापोली ५, गुहागर ६, रत्नागिरी ६ आणि राजापूर ६ केंद्रांचा समावेश आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांचे या केंद्रामध्ये स्थलांतर करून जीवितहानी टाळण्याच्यादृष्टीने हा प्रस्ताव तयार केला आहे.

भूमिगत वाहिन्यांचा २०० कोटीचा प्रकल्प
वादळामुळे किनारी भागात मोठ्या प्रमाणात महावितरण कंपनीचे नुकसान होते. मुख्या वाहिन्या तुटतात, विद्युत खांब पडतात, फिडर बंद पडतात आदी घटना घडतात. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर भूमिगत विद्युतवाहिन्या टाकण्याचा प्रकल्प सुरू आहे. त्याचे ४० टक्केच काम झाले आहे. या प्रस्तावामध्ये किनारी भागातील पाचही तालुक्यांमध्ये सुमार २०० कोटीचा भूमिगत विद्युत वाहिन्यांचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.

किनारपट्टीवर ६९४ कोटीचे ५८ धूपप्रतिबंधक बंधारे
हवामानातील बदलामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वारंवार चक्रीवादळे धडकत आहेत. यामुळे उधाणाच्या भरतीने किनारी भागाची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. समुद्राचे अतिक्रमण वाढले असून ते किनारे गिळंकृत करीत समुद्राचे पाणी नागरी वस्तीमध्ये येण्याची भीती निर्माण झाली आहे. भविष्यात हा धोका कायम आहे. किनारी भागातील रहिवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने किनारी भागात ५८ धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून तो ६९४ कोटीचा आहे. भविष्यात हे बंधारे झाल्यास किनारपट्टीची धूप थांबून तेथील नागरिकांचे संरक्षण होणार आहे.

वीज अटकाव यंत्र आणि पूर्वसूचना प्रणाली
जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वीज पडून जीवित आणि वित्तहानी होते. पावसाळा संपत आल्यानंतर हे प्रमाण अधिक असते. वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यात १५४ वीज अटकाव यंत्रे उभारली जाणार आहेत. त्यामुळे वीज पडल्यास या यंत्राद्वारे अटकाव करून नुकसान न कता थेट अर्थिंग होऊन जमिनीमध्ये जाईल, अशी ही यंत्रणा आहे. गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी ही यंत्रणा बसविली जाणार आहे तर आपत्तीची पूर्वसूचना देणारी प्रणाली बसवली जाणार आहे. सुमारे ८३ ठिकाणी ही प्रणाली असणार आहे. अशाप्रकारे जिल्हा प्रशासनाने आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत जिल्ह्याचा कोट्यवधीचा आराखडा शासनाला सादर केला आहे.