आपत्ती सौम्यीकरणांतर्गत जिल्ह्याला ३३० कोटी ६८ लाखांचा निधी

रत्नागिरी:- कोकण आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत भूमिगत विद्युत वाहिनीसाठी २२९.६० कोटी तर, बहुउद्देशीय निवारा केंद्रासाठी १०१.०८ कोटी अशा एकूण ३३० कोटी ६८ लाखाच्या कामांना शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यामुळे ही कामे सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोकणात आपत्काली परिस्थितीमध्ये किनारी भागात सुरक्षेसाठी प्रशासनाकडून महत्वाच्या उपाययोजना करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य शासनाकडून कोकणासाठी निधी मंजूर झाला होता. आराखडा बनवल्यानंतर त्यातील कामे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. चक्रीवादळामध्ये समुद्र किनारी भागातील वीज वाहिन्या, विद्युत खांब पडून मोठे नुकसान होते. त्यामध्ये दरवर्षी लाखो रूपयांचे नुकसान शासनाला सहन करावे लागते. हा खर्च वाचवण्यासाठी शासनाने भुमिगत विद्युत वाहिन्यांचा निर्णय घेतला होता. रत्नागिरी तालुक्यातील काही भागात लवकरच भुमिगत विद्युत वाहिन्या बसवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्याचबरोबर अतिवृष्टी, चक्रीवादळ यामुळे किनारपट्टीशेजारील गावांमध्ये घरे पडतात, छपरे उडून जातात. त्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागते. त्यांच्यासाठी बहुउद्देशीय निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठ ठिकाणी जागा निश्चित केल्या आहेत. प्रशासकिया मंजूरी मिळाल्यामुळे ही कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. प्रशासकिय मंजूरी मिळालेल्या कामांमध्ये रत्नागिरी ग्रामीण २ येथील भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामासाठी ८७ कोटी ७३ लाख रूपये, रत्नागिरी ग्रामीण १ येथील कामासाठी ६४ कोटी ६२ लाख तर रत्नागिरी शहरासाठी ७७ कोटी २५ लाख रुपये मंजूर आहेत. बहुउद्देशीय निवारा केंद्रांमध्ये गणपतीपुळे, फणसोप, नेवरे, खेडशी, वारे, कुरधुंडा या सहा केंद्रांसाठी प्रत्येकी १४ कोटी ४४ लाख रुपये मंजूर आहेत.