आदित्य ठाकरेंची संवाद निष्ठा यात्रा १६ सप्टेंबरला रत्नागिरीत; पंधरा हजार शिवसैनिक जमणार: आ. साळवी 

रत्नागिरी:- शिवसेनेशी गद्दारी करणार्‍या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची संवाद निष्ठा यात्रा १६ सप्टेंबरला येणार आहे. रत्नागिरीत सकाळी १०.३० वाजता साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळ संवाद निष्ठा सभा होणार असून आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला पंधरा हजाराहून अधिक शिवसैनिक उपस्थित राहतील, असे शिवसेनेचे उपनेते आमदार डॉ. राजन साळवी यांनी सांगितले.

शिवसेनेची जिल्हा कार्यकारीणी झाल्यानंतर आठवडा बाजार येथील शिवसेनेच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संपर्क प्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, प्रमोद शेरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. आमदार साळवी म्हणाले, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर युवासेनाप्रमुख यांनी सिंधुदुर्ग, रायगडसह पश्‍चिम महाराष्ट्रात दौरे केले. रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा निश्‍चित झाला असून आदित्य ठाकरे रत्नागिरी, चिपळूण, दापोलीत शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. ते सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी विमानतळावर येतील. विमानतळावरुन कारने साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळ येतील. तेथे सभा होणार असून आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला रत्नागिरी तालुक्यातील चौदा हजार तर लांजा, राजापूर, संगमेश्‍वरमधून एक हजारहून अधिक शिवसैनिक येणार आहेत. यावेळी शिवसैनिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद असेल. त्यानंतर चिपळूणात त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. दापोलीत दुपारी 4 वाजता संवाद निष्ठा सभा होईल. यावेळी शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत, नेते भास्कर जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनतून शिंदे गटात गेलेल्याविषयी बोलताना डॉ. साळवी म्हणाले, शिवसेनेच्या नावावर निवडून आलेल्यांना विविध पदे दिली. पदे भोगून ते शिंदे गटात गेले आहेत. जे निष्ठावंत आहेत, ते शिवसेनेतच राहतील. जे जाणार आहेत, ते जातील. त्याचा काहीच फरक पडणार नाही. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील सर्वच शिवसैनिक आपापल्या जागेवर आहेत. पुढील आमदार हा शिवसेनेचाच होणार आहे. त्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी तळागाळातील लोकांपर्यंत पोचत आहोत.