यादी मान्यतेसाठी आयुक्तांकडे; पुरस्कार वितरणावर कोरोनाचे सावट
रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून दरवर्षी दिल्या जाणार्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी यंदा 22 प्रस्ताव आले होते. संबंधित शिक्षकांच्या मुलाखतीही झाल्या असून अंतिम यादी मान्यतेसाठी विभागिय आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहे; मात्र कोरोनामुळे शिक्षक दिनी 5 सप्टेंबरला पुरस्कार वितरण करण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
शिक्षण विभागाकडून दरवर्षी आदर्श शिक्षकांची निवड केली जाते. त्यांचा शिक्षक दिनी सन्मान करण्यात येतो. आदर्श पुरस्काराची निवड प्रक्रिया एक महिना पुर्वी सुरु केली जाते. त्यानुसार शिक्षण विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे नऊ आणि विशेष पुरस्कार 1 असे एकुण दहा शिक्षकांची निवड केली जाते. गेली काही वर्षे काही तालुक्यांमधून एकच प्रस्ताव येत होता. त्यामुळे निकोप स्पर्धा होत नव्हती. त्यासाठी शिक्षण विभागाने प्रत्येक तालुक्यातून किमान दोन प्रस्ताव आलेच पाहीजेत असा दंडक घातला, अन्यथा त्या तालुक्याला पुरस्कार दिला जाणार नाही अशी तंबीही दिली होती. त्या अनुषंगाने 22 प्रस्ताव आले होते. काही तालुक्यात तिन प्रस्ताव आलेले होते. त्यामुळे पुरस्कार मॅनेज करण्याच्या प्रकारांवर आळा बसला आहे. नुकत्याच संबंधित शिक्षकांच्या मुलाखती झाल्या असून अंतिम यादी मान्यतेसाठी कोकण आयुक्तांकडे पाठविण्यात आली आहे. शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असल्यामुळे हे पुरस्कार त्यापुर्वी जाहीर केले जाणार आहेत; मात्र सध्या कोरोनाची स्थिती लक्षात घेता पुरस्कार वितरण त्याच दिवशी होणे अशक्य आहे.