रत्नागिरी:- पालकांपेक्षा मुले शिक्षकांच्या सानिध्यात असतात. शिक्षकांचा ते आदर करतात. शिक्षक म्हणून हा आदर कायम ठेवा. भविष्यातील आदर्श पिढी तयार करण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. केवळ पुरस्कारासाठी शाळा सुंदर न करता जिल्ह्यातील सर्वच शाळा सुंदर कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
जिल्हा परिषदेमार्फत प्रतिवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील आदर्श शाळा पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्काराचे वितरण पालकमंत्री श्री.सामंत यांच्या हस्ते आज येथील मराठा भवन येथे झाले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, किरण लोहार, प्राथमिक शिक्षाधिकारी बी. एम. कासार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, प्राथमिक शिक्षकांच्यामुळेच मी उद्योगमंत्री पदापर्यंत पोहचलो, याची मला जाणीव आहे. आता शिक्षकांना कदाचित बाई ऐवजी मॅडम, गुरुजी ऐवजी सर म्हणत असतील. पण, माणसं तीच आहेत. त्यांना असणारा आदर तोच आहे. नासा, इस्त्रो सारख्या ठिकाणी शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच ग्रामीण भागातील आपले विद्यार्थी तेथे भेट देऊन आले. हे विद्यार्थी परिस्थितीने जरी गरीब असले तरी, बुध्दीने श्रीमंत आहेत, असे प्रशंसोद़्गार नासातल्या वैज्ञानिकांनी काढले. आपल्या देशाची, रत्नागिरी जिल्ह्याची शान वाढविणारे हे प्रशस्तीपत्रक आहे. याचे श्रेय शिक्षकांना जाते. माझ्यासारखाच आदर्श शिक्षक मी तयार करेन, अशी शपथ आजच्या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने घेतली पाहिजे. किमान 10 आदर्श विद्यार्थी तयार करेन, अशी देखील शपथ शिक्षकांनी घेतली पाहिजे. त्यादृष्टीने त्यांनी मार्गक्रमण करावे.
शैक्षणिक जीवनात प्राथमिक शिक्षक हा केंद्रबिंदू ठरतो. बालपणी त्यांनी केलेले संस्कार भविष्यातही उपयोगी पडतात, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, पालकांपेक्षा शिक्षकांनी सांगितलेले बरोबर आहे, अशी विद्यार्थ्यांची भावना असते. शिक्षकांनी देखील अभ्यासूवृत्तीने विविध क्षेत्रातील ज्ञान दिले पाहिजे. वयस्कर शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून सूट द्यायला हवी. 100 टक्के निकालाची अपेक्षा करताना शिक्षकांचे प्रश्न सहानुभूतीपूर्वक सोडवून, प्रशासन देखील आदर्श वाटले पाहिजे. काही शिक्षक शिक्षकी पेशाला बदनाम करत असती, जाती-पातीचे राजकरण करत असतील तर, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. शिक्षक संघटनांनीही अशा प्रवृत्तीला चाप लावला पाहिजे. त्यांच्यावर बंधने घातली गेली पाहिजेत. भविष्यातील आदर्श पिढी निर्माण करतानाच सर्व शाळा देखील सुंदर बनवाव्यात. हा पुरस्कार आदर्श शिक्षकापेक्षा मोठा असेल, असे पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार म्हणाले, ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारुन पारदर्शीपणे या अर्जांची छाननी केली आहे. आपल्या जिल्ह्याची गुणवत्ता ही टॉप वनमध्ये आहे. जिल्ह्यातील समृध्द परंपरा जतन करुन ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. त्यादृष्टीने शिक्षक काम करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी मेहनत घ्यायला हवी.