‘आत्मा’ अंतर्गत ‘स्मार्ट’ योजनेचा प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी अवघ्या दोन कंपन्या पात्र

रत्नागिरी:- कृषी विभागाच्या ‘आत्मा’अंतर्गत ‘स्मार्ट’ (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प) योजनेसाठी राज्यातील १ हजार ४३२ शेतकरी उत्पादक कंपन्या प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी पात्र झाल्या आहेत. यामध्ये कोकणातील सात कंपन्यांचा समावेश असून रत्नागिरी जिल्ह्यातील दोनच कंपन्यांचा समावेश आहे. सर्वाधिक कंपन्या पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा भागातील आहेत.

शेतीवरील आधारित मूल्य साखळी विकसित करण्यासाठी शासनाने यंदापासून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) योजना आणली आहे. या योजनेतून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सामूहिक शेती पूरक व्यवसायासाठी योजना राबवली जाणार आहे. ‘उत्पादक भागीदारी आणि उत्पादक भागीदारी करार व बाजार संपर्क वाढ’ अशा दोन प्रकारांत ही योजना आहे.

शेतकरी कंपनीत किमान अडीचशे सभासद असावेत अशी अट आहे. योजनेतून प्रकल्पासाठी साधारण दहा कोटी रुपयांपर्यंत कंपनीला निधी मिळणार आहे. त्यात ६० टक्के अनुदान असेल. ‘स्मार्ट’मध्ये जास्तीत जास्त शेतकरी कंपनी सहभागी व्हावे यासाठी ’आत्मा’च्या अधिकार्‍यांनी तालुका पातळीवर कार्यशाळा घेऊन लोकांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले होते.

राज्यात ४ हजार ४२९ कंपन्यांनी सहभाग घेतला. सहभागी कंपन्यातील सभासद संख्या, नोंदणी, लेखापरीक्षण, आदी महत्त्वाच्या बाबीची तपासणी करून राज्यात आतापर्यंत १४३२ कंपन्याला प्रकल्प अहवाल प्रस्ताव सादर करण्याला परवानगी दिली आहे. काही कंपन्यांनी प्रस्तावही सादर केले आहेत.

पशुसंवर्धन, महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्रामीण विकास यंत्रणा (उपजीविका अभियान) योजनेतून शेतकरी कंपनीला प्रकल्पासाठी लाभ मिळणार आहे. मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेल्या कंपन्यांच्या त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. यामध्ये पूरक उद्योग तसेच प्रक्रियाला प्राधान्य दिले आहे. पात्र ठरलेल्या प्रस्तावांमध्ये रायगड जिल्ह्यातील ३, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी २ कंपन्यांचा समावेश आहे. कोकणातील लोकप्रतिनिधींकडून ही योजना तळागाळातील शेतकर्‍यांपर्यंत पोचवून त्यांना यासाठी सकारात्मक बनविण्याची गरज आहे. आत्मांतर्गत विविध योजनांचा  वैयक्तिक लाभ शेतकर्‍यांना मिळतो. स्मार्ट योजना एकत्रित येऊन करावयाची आहे.