रत्नागिरी:- मोठ्या प्रमाणात प्रक्रियायुक्त पदार्थांच्या वाढलेल्या मागणीचा विचार करुन केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेस मान्यता दिली आहे. केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
कृषी विभागांतर्गत विविध पिकांचे क्षेत्र, उत्पादकता व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सद्य:स्थितीमध्ये पिकांची उत्पादकता जवळपास स्थिरावली असल्याचे दिसून येते. याचबरोबर बाजारातील मागणी आणि त्याचा पुरवठा यो प्रमाण अनेक वेळा विषम असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकर्यांनी चांगले उत्पादन घेऊनही मागणी अभावी त्यांचा माल कमी किंमतीला विकला जातो. अनेक वेळेस फळपिके व भाजीपाला पिकांसारखा नाशवंत शेतीमाल विक्री अभावी वाया जात असल्याने शेतकर्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याचबरोबर वाढत्या शहरीकरणामुळे धापळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण प्रक्रियायुक्त व तयार शेती उत्पादनांचा वापर करत आहे.
केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही केंद्र पुरस्कृत योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीत राबविली जात आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सामाईक पायाभूत सुविधा, मूल्य साखळी या घटकातंर्गत बँक कर्जाशी निगडीत ग्राह्य प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के कमाल 3 कोटी रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दण्यात येणार आहे. तसेच पात्र संस्थांसाठी किमान अनुभव व आर्थिक उलाढाल याची अट नाही. तथापी प्रकल्पासाठी बँकेची कर्ज पूर्व सहमती आवश्यक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी अधीक्षक कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी केले आहे.