रत्नागिरी:- केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खादय प्रक्रिया उदयोग उन्नयन योजना ही असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राबविली जाणार आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक जिल्हा एक उत्पादन या बाबीखाली आंबा या पिकाला मंजूरी दिली आहे. ही योजना 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षात राबविली जाणार असून प्रक्रिया उद्योगांना वृध्दींगत करण्यासाठी आर्थिक साह्य मिळणार आहे.
या योजनेत वैयक्तीक शेतकरी, स्वयंसहाय्यता गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांना आंबा प्रक्रिया उदयोगाच्या उभारणीसाठी किमतीच्या 35 टक्के आणि कमाल 10 लाख रुपये बँक कर्जाशी निगडीत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना बीज भांडवल (40 हजार रुपये प्रति सदस्य) बचत गटातील सदस्यांना वैयक्तीक अन्न प्रक्रिया उदयोगासाठी सहाय्य, बचत गटाच्या फेडरेशनसाठी भांडवली गुंतवणुकीसाठी सहाय्य, बचत गटांना प्रशिक्षण इ. घटकांचा समावेश राहील त्याचप्रमाणे सामुहिक सुविधा केंद्र व बॅडिंग वं मार्केटिंग साठीही सहाय्य केले जाणार आहे.
या योजनेत रत्नागिरी जिल्ह्यासाठी वैयक्तीक उदयोजकांकरीता 11, स्वयंसहाय्यता गटाकरिता 7, शेतकरी उत्पादक कंपन्यांकरीता 1 व सहकारी उदयोजक संस्था करीता 1 असे एकूण 20 अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठीचे लक्षांक 2020-21 करीता प्राप्त झाले आहे. सध्या इच्छुक वैयक्तीक शेतक-यांनी एमआयएस पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचे आहेत. इच्छुक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संस्था, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था यांनी ऑफलाईन पध्दतीने तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज करावयाचे आहेत. वैयक्तीक लाभार्थी http://pfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करु शकतील. जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेंतर्गत प्रस्ताव द्या असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.