आता प्रवासात गाडीची मूळ कागदपत्रे सोबत बाळगण्याची गरज नाही कारण…

१ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू

रत्नागिरी:- वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. वाहन चालकांना गाडी चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्श्युरन्स, पोल्यूशन सर्टिफिकेट (PUC) यांसारखी कागदपत्रे जवळ ठेवण्याची गरज लागणार नाही. एकंदरीत गाडीची कागदपत्रं जवळ बाळगण्याची गरज नाही. केंद्र सरकारनं मोटर वाहन नियम १९८९ मध्ये केलेल्या विविध संशोधनासंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. 

केंद्रीय मोटार वाहन अधिनियमात केलेल्या दुरुस्तींची 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यानुसार आता प्रवासादरम्यान वाहनांची मूळ कागदपत्रे सोबत बाळगण्याची गरज उरणार नाही.

 माहितीनुसार, मोटर वाहन नियमांमध्ये महत्त्वाचे बदल आहेत. १ ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि ई-चलानसह वाहनाच्या कागदपत्रांची नोंद माहिती तंत्रज्ञान पोर्टलद्वारे केली जाणार आहे. परवाना रद्द करणे, ई-चलान नोंदणी यांसारखी सर्व कामे इलेक्‍ट्रॉनिक पोर्टलद्वारे केली जाणार आहे. १ ऑक्टोबरपासून पोर्टलच्या माध्यमातून वाहनांसंदर्भातील डॉक्यूमेंट आणि ई चलानची माहिती वाहतूक विभागाकडे साठवली जाईल आणि वेळोवेळी अपडेट होणार आहे. यासाठी डिजिटल कागदपत्रांची आरटीओकडून पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर डिजीटल कागदपत्रे सोबत ठेवण्यास चालकाला परवानगी असणार आहे.