आता गावातच होणार पाण्याची रासायनिक तपासणी

रत्नागिरी:+ ‘जल जीवन मिशन’ कार्यक्रम मोहीमेअंतर्गत जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी गावातल्या गावात होणार आहे. रासायनिक किट जिल्ह्यातील  846 ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात आली असल्याचे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी सांगितले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ‘जलजीवन मिशन’ अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत “हर घर नल से जल” याप्रमाणे प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशन चे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. यामध्ये गावस्तरावर रासायनिक ‘फिल्ड टेस्ट किट’ च्या सहाय्याने जलसुरक्षक व महसुल गावनिहाय निवडण्यात आलेल्या पाच महिलांद्वारे पिण्याच्या पाण्याची तपासणी होणार असल्याचे प्रतिपादन किर्ती किरण पुजार (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रत्नागिरी यांनी केले.

पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत रासायनिक फिल्ड टेस्ट किटच्या गावस्तरावरील प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर “प्रशिक्षकांचे प्रशिक्षण” या सदराखाली तालुक्यातील सर्व आरोग्यसेवक, पाणी व स्वच्छता विभागातील गट संसाधन केंद्रातील कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने त्यांनी तालुकास्तरावरील सर्व जलसुरक्षक व महसूल गावनिहाय पाच महिला प्रतिनिधींना कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र, गट व समुह स्तरावर प्रशिक्षणांचे नियोजन करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. त्यानंतर प्रशिक्षण संपन्न झाल्यानंतर संबंधीत जलसुरक्षक व पाच महिलांनी महसूल गांवनिहाय शाळा व अंगणवाडी, शासकीय इमारती व कुटुंबस्तरावरील वितरण बिंदूं पासून पाण्याची तपासणी करुन त्याची नोंद ‘डब्लूक्यूएमआयएस’ या केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर करणे अपेक्षित आहे.

या मोहीमे अंतर्गत पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी गावातल्या गावात होणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तसेच त्यामध्ये प्रमाणित असणारे रासायनिक घटक हे पिण्यास योग्य प्रमाणात आहेत अथवा अयोग्य हे या रासायनिक फिल्ड टेस्ट कीट द्वारे गावाला कळण्यास मदत होईल. रासायनिक फिल्ड टेस्ट कीट जिल्हयातील 846 ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात आले आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तसेच त्यामध्ये प्रमाणित असणारे रासायनिक घटक हे पिण्यास योग्य प्रमाणात आहेत अथवा अयोग्य हे या रासायनिक ‘फिल्ड टेस्ट किट’द्वारे गावाला कळणार आहे.