नगराध्यक्ष साळवी ; माल जप्त करून सिमेबाहेर सोडणार
रत्नागिरी:- ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टने पुन्हा धास्ती वाढवली आहे. त्यामुळे भितीपोटी गेली काही महिने लसीकरणासाठी प्रतीक्षा कराव्या लागणाऱ्या पालिकेच्या केंद्रामध्ये गर्दी होऊ लागली आहे. रत्नागिरीत याचा बाधित येऊ नये, यासाठी पुढील आठवडा बाजारात येणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याला दोन डोस सक्तीचे केले आहे. डोस न घेतलेल्या वापाऱ्याचा मालमत्ता विभागाकडून माल जप्त करून संबंधित व्यापाऱ्याला शहराच्या सीमे बाहेर सोडण्याचे फर्माण नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी काढले आहे.
ओमायक्रॉन बाधितापासून मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढताना दिसत आहे. राज्यात त्याचा प्रवेश झाला असून अनेक ठिकाणी ओमायक्रॉनचे बाधित सापडले आहे. त्यापैकी कोणाचा मृत्यू झाल्याची नोंद नसली तरी एक व्यक्ती ५० ते ६० वर लोकांना बाधित करू शकतो, एवढ्या वेगाने पसरणारा हा विषाणू आहे. कोरोना आटोक्यात आल्यामुळे नागरिक बिनधास्त होते. अनेकांनी लसीकरणाकडेही दुर्लक्ष केल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालत स्पष्ट झाले आहे. मात्र आता या लोकांची धास्ती वाढली आहे. पालिकेमार्फत ऑफलाईन लसीकरण कित्येक महिने सुरू आहे. मात्र गेली दीड ते दोन महिने या केंद्राला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. नियुक्त कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी येणाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागते. नगरसेवक आपापल्या प्रभागातील नागरिकांना लसीसाठी बोलवून घेत होते. अपेक्षित प्रतिसाद नसल्याने मधल्या काळात काही दिवस केंद्र बंद ठेवले होते. मात्र ओमियोक्रॉनच्या नव्या व्हेरिएन्टमुळे नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण आहे. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने लस घेण्यास टाळाटाळ करणारे आता पुन्हा लसीकरणासाठी पालिकेच्या केंद्रावर गर्दी करत आहेत.
कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे पालिकेने शनिवार आणि मंगळवार आठवडा बाजार दोन आठवडे झाले सुरू केला आहे. शहरामध्ये कोरोना संसर्ग पूर्ण नियंत्रणात आहे. पुन्हा नव्या व्हेरिएन्टची बाधा होऊ नये, यासाठी पालिकेने खबरदारी म्हणून कडक पावले उचलली आहेत. परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांचे दोन डोस पूर्ण असणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी पुढच्या शनिवारपासून मालमत्ता विभागाकडून व्यापाऱ्यांची पूर्ण माहिती घेऊन त्यांना बाजारात बसण्याची परवानगी दिली जाणार आहे.