रत्नागिरी:- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुसरी लाट येण्याची भिती व्यक्त केली असतानाच दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी पर्यटक बिनधास्तपणे कोकणातील किनार्यांवर उतरलेले आहेत. त्यामुळे किनारे फुलेले असून पर्यटन व्यावसायाला चालना मिळाली आहे. गेल्या आठवडाभरात गणपतीपुळेमध्ये सुमारे 40 हजार पर्यटकांनी भेट दिल्याचा अंदाज आहे. कोरोनाचे नियम, निकषाकडे दर्शन रांगांसह किनार्यांवरील पर्यटकांकडून कानाडोळा केला जात असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
दिवाळी पाडव्याच्या दिवशी राज्य शासनाने दर्शनासाठी मंदिरे सुरु करण्याचा निर्णय घेतला. मध्यम वर्गीय पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडू लागला. गुहागर, दापोलीसह गणपतीपुळेतील किनार्यांवर पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहेत. दिवसाला साडेचार हजाराहून अधिक पर्यटक गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी येऊन जात आहेत. त्याचा फायदा मंदिर परिसरातील फेरीवाले, हॉटेल-लॉजिंग व्यावसायिकांना होत आहे. बहूतांशी पर्यटक हा सांगली, सातारा, कोल्हापूर येथील आहे. एका दिवसात गणपतीपुळेत दर्शन घेऊन ते माघारी जातात. त्यामुळे लॉजिंग, न्याहारी निवास याकडील कल 40 टक्केच आहे.
गणपतीपुळे परिसरात हॉटेल-लॉजिंगसह छोटे-मोठे सुमारे तीनशेहून अधिक व्यावसायिक आहेत. कोरोनातील टाळेबंदीत त्यांचा व्यावसाय पूर्णतः बंद होता. या कालावधी पर्यटकच नसल्याने मोठा तोटा सहन करावा लागला. गेल्या आठ दिवसातील पर्यटकांचा राबता त्यांच्या पथ्थ्यावर पडला आहे. सात महिन्यातील तोटा भरुन निघाला नसला तरीही पैशाची रेलचेल सुरु झाल्याचे समाधान व्यावसायिक व्यक्त करत आहे. रविवारी (ता. 12) पर्यटकांची गर्दी बर्यापैकी होती. या आठवड्यात चौथा शनिवारी, रविवार आणि गुरुनानक जयंती अशा जोडून सुट्ट्या येणार असल्यामुळे पर्यटकांचा राबता असाच कायम राहण्याची शक्यता आहे. कोरोनाचे सावट असले तरीही सद्यःस्थितीत पुन्हा टाळेबंदी होईल असे वाटत नाही. कोरोनाला सामोरे जाण्यासाठी शासनाने सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर याचा अवलंब करावा अशा सुचना दिल्या आहेत. त्याकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहेत. आम्ही आताच ट्रॅव्हल्समधून एकत्र आलो, आता रांगेत अंतर ठेवून कशाला उभं रहायचं अशा प्रतिक्रियाही ऐकायला मिळत आहेत. अशा लोकांपुढे मंदिर व्यवस्थापनही हतबल झाले आहे.