अपुर्या यंत्रणेची कसरत ; कोरोना प्रतिबंधाचे आव्हान
रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. तरी संसर्ग आटोक्यात आलेला नसताना गेल्या सात ते आठ दिवसांमध्ये थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 13 हजार चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मुळातच वैद्यकीय सुविधांचा अभाव, कमी मनुष्यबळ आदींचा विचार करता कोरोना फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.
जिल्ह्यात रात्री उशिरापासून आणखी 82 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 148 वर गेली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात सुरवातीच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये जिल्ह्याला चांगले यश आले. मुंबई, पुणे आदी भागात कोरोनाचा संसर्ग वाढत होता. राजकीय आशीर्वाद आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घाबरलेले चाकरमानी गुपचूप जिल्ह्यात दाखल झाले आणि कोरोनाचा फैलाव सुरू झाला. बाधित रुग्णांचा प्रवासाचा इतिहास मुंबई येऊ लागला; मात्र हे सत्र काही थांबलेले नाही. आता तर गणेशोत्सवासाठी आणखी चाकरमानी जिल्ह्यात येत आहेत. त्यासाठी एसटीची व्यवस्था आहे. यापूर्वी खासगी वाहनांनी लोक येत होते. आलेल्या लोकांना क्वारंटाईन केले जात होते. गेल्या सात ते आठ दिवसात जिल्ह्यात तब्बल 13 हजार चाकरमानी दाखल झाले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून दरदिवशी मिळणार्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी सव्वा ते दीड लाख चाकरमानी दाखल झाले आहेत. चाकरमानी आले पाहिजेत, मात्र तशी त्यांची व्यवस्था व्हायला हवी.रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत आरोग्य यंत्रणा तेवढी सक्षम दिसत नाही. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरण किंवा कोविड सेंटरबाबत अनेक तक्रारी येत आहेत. मनुष्यबळ कमी असतानाच कोविड योद्धा डॉक्टर, नर्स आदी बाधित होत असल्याने ही समस्या वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटर वाढविण्यापासून खासगी डॉक्टरांची मदत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.