आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा श्रीगणेशा 

रत्नागिरी:-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने १५ ते १८ वयोगटातील मुलांचे कोविड लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरीत आठवड्यातून दोन वार लसीकरणासाठी निश्‍चित केले आहेत. ३ जानेवारीपासून मुलांसह हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेले नागरिक यांनाही लस दिली जाणार आहे.

ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण आठवड्यातून बुधवार व शनिवार या दोन दिवशी घेण्यात येत आहे.  लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लसीचाच वापर करण्यात येणार आहे. हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांनी दोन्ही डोस घेतले असतील तर त्यांना १० जानेवारी २०२२ पासून प्रिकॉशन डोस देण्यात यावा. ६० वर्षे वा वरील सहव्याधी असलेल्या व्यक्तिंना त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या सल्ल्याने १० जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे. यासाठी दुसर्‍या डोसनंतर ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेला असणे अपेक्षित आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना व त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदयजी बने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी केले आहे.