रत्नागिरी:- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पालिकांमध्ये भाजपा जोरदार तयारीने उतरणार असून रत्नागिरी जिल्ह्या परिषदेत किमान 25हून अधिक जागा जिंकू असा विश्वास भाजपाचे राज्य उपाध्यक्ष व कोकण संपर्क प्रमुख प्रसाद लाड यांनी सांगितले. रत्नागिरीत सामंतांच्या साम्राज्याला धक्का कसा लागेल याचा कानमंत्र कार्यकर्त्यांना दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरीत आलेल्या प्रसाद लाड यांनी भाजपच्या स्थापना दिवसानिमित्ताने गुरुवारी भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची चांगलीच कान उघडणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी दोन वर्षात कोकणात भाजपाची वाटचाल कशी असेल याबाबत माहिती दिली. कोकणात भाजपाकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासारखे ब्रम्हास्त्र आहे. त्याचप्रमाणे आशिष शेलार, रविंद्र चव्हाण, प्रवीण दरेकर यांच्या मदतीने कोकणातील भाजपाची वाटचाल अधिक गतीशील करणार आहोत. भविष्यातील जि.प. निवडणुकीत सिंधुदुर्गात भाजपाचा अध्यक्ष असेल तर रायगडही भाजप काबीज करेल. रत्नागिरीत भाजपची स्थिती सद्या चांगली होत आहे. याठिकाणीही 25 ते 30 जागा निश्चित जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2024मध्ये रत्नागिरीत भाजपाचा खासदार असेल असेही त्यांनी स्पष्ट करताना, आमदारांची संख्याही वाढणार आहे.
जिल्ह्यात संघटनात्मक कार्य चांगले असून जे पदाधिकारी पक्षाच्या कार्यक्रम व बैठकांना वारंवार अनुपस्थित राहतील त्यांना पदावरुन बाजूला करुन नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. यापुढे नेत्यांच्या पाठी फिरण्यापेक्षा पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहीजे असेही त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरीत सामंतांचे वर्चस्व आहे. त्यांच्या वर्चस्वाला धक्का कसा बसेल याकडे लक्ष दिले जाणार आहे. राक्षसाचा प्राण पोपटात असतो त्याचप्रमाणे नगर परिषद व जिल्हा परिषद ताब्यात घेऊन धक्का दिला जाणार आहे. पुढील महिनाभरात जिल्ह्यातील नव्या-जुन्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रीय करण्यासाठी भेटीगाठी घेणार आहे. उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी वैयक्तिक कारणास्तव राजिनामा दिला आहे. मात्र त्यांचा राजिनामा स्वीकारलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुढील निर्णय होतील असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष सचिन करमरकर उपस्थित होते.
रत्नागिरीत मविआ विरोधात लवकरच आक्रोश मोर्चा
रत्नागिरीत अनेक विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. अनेक कामे खोळंबली आहेत. महाविकास आघाडीला जागे करण्यासाठी लवकरच भाजपतर्फे रत्नागिरीत आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले.