आंबेशेत घोसाळेवाडीत रंगला पालखी उत्सव सोहळा

हजारो भाविकांची उपस्थिती


रत्नागिरी:- शहरानजीकच्या आंबेशेत घोसाळेवाडी येथे शिमगोत्सवानिमित्त अनोख्या पालखी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 25 मार्च रोजी हा पालखी उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविकांनी आंबेशेत घोसाळेवाडी येथे हजेरी लावली होती. पालखी उत्सवानिमित्ताने घोसाळेवाडीला जत्रेचेच रूप आले होते. या पालखी उत्सवात माखजनच्या वाघजाई ग्रुपने बाजी मारली.


कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह लहानांपासून मोठ्यांपर्यंत असतो. शिमगोत्सवानिमित्त प्रत्येक गावची ग्रामदेवता भक्तांच्या भेटीला मंदिरातून बाहेर पडते. या निमित्त गावागावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रत्यक्ष देव घरी येणार म्हणून अनेक दिवस आधी तयारी केली जाते. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.आंबेशेत येथील घोसाळे वाडीत देखील मागील अनेक वर्षे शिमगोत्सवात अनोख्या अशा पालखी नृत्य उत्सवाचे आयोजन करण्याची परंपरा जोपासली गेली आहे. अनेक वर्षांपासून घोसाळेवाडीने ही परंपरा जपली आहे. रत्नागिरीत होणाऱ्या अनोख्या अशा या पालखी उत्सवाला हजेरी लावणाऱ्या भक्तांची संख्यादेखील मोठी असते.

या वर्षी 25 मार्च रोजी हा पालखी नृत्य उत्सव आयोजित करण्यात आला होता. शिवशक्ती मित्रमंडळ रत्नागिरी आंबेशेत घोसाळेवाडी यांच्याकडून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा पालखी उत्सव येथील शिमगोत्सवाचे वैशिष्ट्य समजले जाते. यावर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा पालखी उत्सव रंगला. या पालखी उत्सवात जिल्ह्यातून अनेक संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाला पालखी खेळवण्यासाठी 20 मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. या कालावधीत उत्कृष्ट पालखी खेळवणाऱ्या तीन संघांचा शिवशक्ती मित्रमंडळा कडून गौरव करण्यात आला. यामध्ये माखजनच्या वाघजाई संघाचा प्रथम, कालकाई येसूरडे संघाचा द्वितीय, तोणदे सिद्धिविनायक संघाला तिसरा क्रमांक देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला माजी जि. प. अध्यक्ष आबा घोसाळे, माजी नगरसेवक मधुकर घोसाळे, अनिल घोसाळे, अशोक घोसाळे, उद्योजक शेखर घोसाळे, अशोक घोसाळे, दत्ताराम घोसाळे, रामदास घोसाळे, प्रदीप घोसाळे, प्रीतम घोसाळे, सुधीर भाटकर, प्रियेश झापडेकर, संजय घोसाळे आणि अण्णा झापडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.