आंबेडकर जयंतीला देखील मिळणार आनंदाचा शिधा

रत्नागिरी:- दीपावलीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला राज्यातील शिधापत्रिकाधारकांना ’आनंदाचा शिधा’ देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. 100 रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल असा हा शिधा असणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समावेश असलेल्या जिल्ह्यातील 11 लाख 26 हजार 780 लाभार्थ्यांना या आनंदाच्या शिधाचा लाभ मिळणार आहे.

शासनाने यापूर्वी दिवाळीत आनंदाचा शिधा म्हणून रवा, चणाडाळ, साखर आणि तेल या चार वस्तूंना एकत्रित देण्याचे जाहीर केले. अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या प्राधान्य आणि अंत्योदय कुटुंबाला हा शिधा देण्यात आला होता. मात्र, उशिरा निविदा काढल्याने हा शिधा काहींना उशिरा मिळाला. त्यामुळे या लाभार्थींना ऐन दिवाळीत हा आनंदाचा शिधा मिळाला नाही. त्यामुळे मोजक्याच लोकांची दिवाळी गोड झाली. शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा सर्वसामान्यांचा गुढीपाडवा गोड व्हावा, यासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला हा शिधा देण्यात येणार आहे.

अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार 22 मार्चला गुढीपाडवा आणि 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिधा दिला जाणार आहे. जिल्ह्यातील अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य गटातील 9 लाख 10 हजार 672 लाभार्थी आणि अंत्योदय गटातील 1 लाख 36 हजार 107 लाभार्थी अशा 11 लाख 26 हजार 780 लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे नागरिकांचा सण, उत्सव आनंदात साजरा होणार आहे. आता येत्या मराठी वर्षाच्या प्रारंभी, गुढीपाडव्याला आणि आंबेडकर जयंतीला हा शिधा दिला जाणार आहे. त्यासाठी बैठका घेऊन निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे हा शिधा वेळेवर मिळण्याची शक्यता आहे.