आंबा बागायतदारांना सरसकट कर्जमाफी द्या

रत्नागिरी:- कोरोनापाठोपाठ आलेले निसर्ग वादळ, लांबलेला पाऊस यामुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामधून बाहेर काढण्यासाठी सरसकट कर्जमाफी, कर्जावरील व्याजामध्ये सूट, आयकरात शिथिलता मिळावी अशी मागणी शासनाकडे करण्याचा निर्धार आंबा बागायतदारांनी केला.

रत्नागिरीतील अंबर मंगल कार्यालयात झालेल्या आंबा उत्पादक संघाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, काका मुळ्ये, तुकाराम घवाळी, बावा साळवी, सतीश शेवडे, राजेंद्र कदम आदी बागायतदार उपस्थित होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ भेटणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
निसर्ग वादळामुळे बागायतदारांचे फार मोठे नुकसान झाले. शासनाकडून मिळणारी मदतही प्रलंबित आहे. 2014-15 या वर्षातील रूपांतरित कर्जावरील 2015-16 या वर्षाचे संपूर्ण व्याज आणि पुढील चार वर्षाचे 6 टक्के दराने व्याज शासनाने अदा करण्याचा निर्णय झाला. त्यापासून शेतकरी अजूनही वंचित आहेत.

कृषी व कृषी निगडित थकीत कर्जांसाठी अनेक जाचक अटी शिथिल कराव्यात. चालू हंगामासाठी जी कर्जे उचल झाली आहेत, त्यातील निम्मी रक्कम शासनाने माफ करावी. शेती कर्जासाठी कमीत कमी व्याजदराने कर्ज पुरवठा व्हावा. सध्या 3 लाखापर्यंत 6 टक्के व्याज आकारले जाते. 3 लाखाची मर्यादा वाढवून व्याजदर कायम ठेवण्यात यावा. कर्जमाफीवेळी जर बागायतदार आयकरदाता असेल तर त्याचे कर्ज माफ होत नाही; परंतु काही बागायतदारांना आयकर रिटर्न दाखल नसेल तर कर्जपुरवठा करत नाहीत. त्यामुळे कर्जमाफीतील आयकाराची अट शिथिल करावी. यंदाच्या हंगामात आंबा उत्पादकांना फवारणीची औषधे माफक दरात उपलब्ध व्हावीत. या बाबींची दखल शासन गांभीर्याने घेईल, अशी मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.