आंबा बागायतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत 21 ऑगस्टला बैठक

रत्नागिरी:- औषधे, खतांच्या किंमती नियंत्रीत ठेवणे, कर्जमाफी आणि विजबिलांच्या जादा भारातून आंबा बागायतदारांची सोडवणुक यासह आठ ते दहा मागण्या राज्य व केंद्र सरकारकडे करण्याचा निर्णय आंबा उत्पादकांनी घेतला आहे. बागायतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २१ ला बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी बागायतदारांच्या समस्या मांडण्यात येणार आहेत.

आंबा बागायतदार लागवडीपासुन काढणीपर्यंत अहोरात्र कष्ट घेतात. खते, किटकनाशके, औषधे प्रचंड महाग झाली आहेत. फळमाशीचा प्रादुर्भाव, पाठोपाठ फयान, तोक्ते, निसर्ग ही वादळे, अवकाळी पाऊस यासारख्या संकटांचाही समाना करावा लागत आहे. शेतकर्‍यांच्या संकटात सरकार आणि प्रशासनाकडू कसलेही सहकार्य मिळत नाही. कर्जमाफीसारख्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाहीत. २०१४-१५ या वर्षाचे संपूर्ण व्याज माफ करण्याचा आणि पुढील चार वर्षाचे ६ टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला होता; परंतु सात वर्षे झाली त्याची अमंलबजावणीच झाली नाही. संकटग्रस्त बागायतदारांना राज्य व केंद्र सरकारने संकटातून मुक्त करणे गरजेचे आहे. बागायतदार व शेतकरी कर्जदारांना बी बियाणे मोफत उपलब्ध करुन द्यावे, संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, निवडणूकीच्या वेळी शेतकर्‍यांच्या कल्याणकारी योजनांच्या घोषणाच घोषणा राजकिय पक्षांकडून होतात पण सातारा कोरा केला जात नाही. ज्या शेतकर्‍यांनी तडजोडीमध्ये कर्ज फेड केली. बँकांनी शेतकर्‍यांना ६ टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन दिले पाहिजे. खते, किटकनाशके, औषधे, रॉकेल, पेट्रोल प्रमाणित असावी. त्यावरील महागाई व इतर कर कमी करण्यात यावेत. विजबिलांची १०० टक्के वसुली असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना चुकीची थकीत बिले काढून विजकंपन्यांकडून होत असलेला शेतकर्‍यांना लुटण्याचा डाव तात्काळ थांबला पाहिजे. अवास्तव वीज दरवाढ तात्काळ रद्द करावी. शेती, फळपिके, भाजीपाला यांचा जंगली जनावरांपासून संरक्षण होण्यासाठी उपाययोजना झाल्या पाहीजते. आंबा, काजू बागायतदार शेतकरी यांना पिक विमा नुकसान भरपाई आणि विमा रक्कमेतील तफावत मिळाली पाहिजे. बागायतदार शेतकरी उत्पादन निर्माण करु शकतात, पण विकु  शकत नाहीत. त्यासाठी शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे अशा मागण्या करण्यात येणार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी माती परिक्षण, खतांचे परिक्षण, औषधांचे परिक्षण करण्यासाठी सक्षम प्रयोगशाळा उभारण्याची गरज आहे. २१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता अल्पबचत सभागृहात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बागायतदारांच्या समस्यांवर बैठक होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा बॅक प्रतीनिधी, कृषि अधिकारी उपस्थित राहणार आहे. या बैठकीला बागायतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ओबीसी संघर्ष समितीचे नंदकुमार मोहिते आणि आंबा उत्पादक संस्थेचे प्रकाश उर्फ बावाशेठ साळवी यांनी केले आहे.