आंबा, काजू बागांमध्ये ड्रोणद्वारे औषध फवारणीचा लवकरच श्रीगणेशा 

रत्नागिरी:- डोंगराळ भागात पसरलेल्या आंबा, काजूच्या बागांमधील औषध फवारणीसाठी दरवर्षी बागायतदारांना मोठा खर्च करावा लागतो. तो खर्च वाचवण्यासाठी आता ड्रोणद्वारे फवारणी करणे सोयीस्कर ठरणार आहे. सात मिनिटात एक एकर बागायत क्षेत्रावर फवारणी केली जाते. जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी कार्यालयामार्फत प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे झालेल्या दहा प्रात्यक्षिकांमधून ड्रोणद्वारे फवारणींचे तंत्रज्ञान पुढे आले आहेत. तंत्रामुळे कोकणातील बागायतदारांचा मोठा खर्च वाचणार आहे.

कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), माऊली ग्रीन आर्मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती, गरूडा एरोस्पेस यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दहा शेतकर्‍यांच्या बागायतींमध्ये ड्रोनचा वापर करुन औषध फवारणीची प्रात्यक्षिके करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील पाचशेहून अधिक बागायतदारांनी सहभाग घेतला होता. कोकणात डोंगर उतारावरील, सपाटीवरील आंबा व काजूच्या बागायतींचे क्षेत्र आहे. गेल्या काही वर्षात भल्या मोठ्या आंबा कलमांची जागा आता कमी उंचीच्या रोपांनी घेतली आहे. पुरुज्जीवनावर भर दिला जात आहे. आंबा काढणीसाठी येणारा अमाप खर्च, हवामानामुळे उत्पादनातही सातत्य नसल्याने बागायतदार अडचणीत येतो. यासाठी आंबा व्यावसायिकांपुढे खर्च कपातीचे मोठे आव्हान असते. हवामानातील बदलांमुळे बागायतदारांना वारंवार औषध फवारणी करावी लागते. दहा वर्षांपुर्वी चार फवारण्या होत होत्या, आता त्यात दुप्पट वाढ झाली आहे. क्षेत्रानुसार फवारणीचा खर्च होत असतो. मजुरीचे दर वाढले असून दिवसाला एक मजुर तिनशे ते चारशे रुपये घेतात. आंबा हंगाम तिन महिन्याचा असून औषध फवारणीसाठीचा खर्च दिवसेंदिवस बागायतदारांना परवडत नाही. शेती नांगरणी, गवत काढणी यासाठी आता तंत्राचा वापर केला जातो. आता औषध फवारणीसाठीही ड्रोनचा वापर केला जाऊ लागला आहे. ही फवारणी शेतकर्‍यांनाही फायदेशीर ठरू शकते. एका एकरमध्ये सरासरी शंभर झाडे असतात. त्यावर ड्रोन द्वारे फवारणी केल्यास सात मिनिटे लागतात. दहा लीटर औषध साठवून ठेवण्याची क्षमता ड्रोनमध्ये आहे. ड्रोन एकदा हवेत सोडल्यास तो जास्तीत जास्त पंधरा मिनिटे ठेवता येतो. तशी रचना केलेली असते. ड्रोनसाठी सुमारे साडेआठ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यावर कृषी विभागाकडून अनुदान दिले जाते.