आंबा, काजू उत्पादक शेतक-यांना सहा महिन्यांपासून हवामान आधारित पीकविम्याची प्रतिक्षा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हयामध्ये फलोत्पादन व रोजगार हमी योजनेतून लागवड योजना लागू झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर आंबा,काजू या खरीप हंगामातील नगदी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे फळधारणा होणा-या या फळपिक झाडांच्या हवामानावर आधारीत विमा योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना आर्थिक नुकसानीची झळ बसून पुर्णतः नुकसान होऊ नये म्हणून विम्याचा लाभ दिला जातो.

यामध्ये यावर्षीच्या आंबिया हंगामामध्ये ज्या बागायतदार शेतक-यांनी फळपिक विमा काढलेला होता त्यानुसार त्यांना विमाछत्र असणा-या कालावधीत अनेक वातावरणीय बदल, पाऊस याचा परिणाम होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे फळधारणा अत्यल्प झाली होती. आता हंगाम संपून सहा महिने झाले तरीही विमा कंपनीकडून कोणत्याही प्रकारे नुकसानीची टक्केवारी वा अन्य माहिती व विमा रक्कमे विषयीची माहिती दिलेली नसल्याने आता शेतक-यांना पुढील हंगामासाठी खते,औषधे खरेदीसाठी पैशांची आवश्यकता असल्याने विमा रक्कम तातडीने मिळण्याची गरज आहे. खरीप आंबिया हंगामातील फळपिकांसाठी हवामानावर आधारीत योजना शासनाने शेतक-यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागातील प्रामुख्याने आंबा, काजू या मोठ्या प्रमाणावर लागवड केलेल्या हंगामी नगदी फळपिकांसाठी विशेषतः तयार केलेली आहे. त्यामध्ये गतवर्षी सन २०२२ २०२३ या हंगामामध्ये अनेक शेतक-यांनी या अंतर्गत विमा उतरविलेला आहे. यामध्ये आंबा, काजू या फळपिकांसाठी फलधारणेच्या कालावधीत पाऊस, कमी -जास्त तापमान वेगाचे वारे, गारपीट या हवामान धोक्यापासून फळपिकांना निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतक-यांना विमा संरक्षणातून आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच याव्दारे फळपिक नुकसानीच्या अंत्यत कठीण परिस्थितीत शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी आणि शेतक-यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास देणे असे या योजनामागील शासनाचे उद्दिष्ट्ये आहे मात्र ते शेतकर्‍यांना पूर्ती होताना दिसत नाही आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात विमा योजनेंतर्गत ८१ कोटी २४ लाख २८ हजार ३४ रुपयांचा परतावा जिल्ह्यातील २४ हजार ६१३ शेतकऱ्यांना गतवर्षीसाठी मिळेल, अशी शक्यता आहे. मागील हंगामात आंबा उत्पादन अत्यल्प असल्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील गतवर्षी २६ हजार २८२ आंबा व ५ हजार ८३५ काजू उत्पादक मिळून एकूण ३२ हजार ११७ शेतकऱ्यांनी एकूण १७,६२२.४३ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला होता.

जिल्हयातील महसुल व कृषी मंडळांच्या कार्यक्षेत्रानुसार ही योजना राबवली जाते. गेल्या काही वर्षात शेतक-यांमध्ये हवामानामुळे उदभवणा-या धोक्यांच्यामुळे होणा-या आर्थिक नुकसानीची हानी टाळण्यासाठी विमा काढण्याकडे शेतक-यांचा कल वाढलेला आहे. परंतु गतवर्षीचा विमा अद्यापही शेतक-यांना मिळालेला नाही आहे.गतवर्षी सन २०२२ – २०२३ या हंगामामध्ये तसेच आंबा या पिकासाठी १ डिसेंबर ते १५ मे या कालावधीत अवेळी पाऊसाचा निकष होता. व त्या कालावधीत मे मध्ये बहुतांश ठिकाणी अवेळी पाऊस झाला आहे. तसेच १ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत कमी तापमानाचा निकष होता. त्या कालावधीत जानेवारी अखेरीस कमी तापमान झाले होते. तसेच १ मार्च ते १५ मे या कालावधीत जास्त तापमानाचा निकष होता या कालावधीत यंदा सर्वाधिक उष्णता होती त्यामूळे विमा भरपाईच्यासाठी सर्व निकष पूर्ण होत आहेत. तसेच १डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत काजू या पिकासाठी कमी तापमानाचा निकष होता व त्या कालावधीमध्ये जानेवारी अखेरीस मोठी तापमान घट झाली होती. तसेच १ जानेवारी २०२३ ते १० मार्च २०२३ या कालावधीत कमी तापमानाचा निकष होता त्या कालावधीत जानेवारी अखेरीस कमी तापमान झाले होते. तसेच १ मार्च ते १५ मे या कालावधीत जास्त तापमानाचा निकष होता. त्यानुसार मार्च महिन्यात तापमानात वाढ झाली होती. या हवामानाच्या बदलामुळे काजू या पिकाच्या फळधारणेवर व परिपक्वतेवर परिणाम होऊन उत्पादनात घट झाली त्यामुळे या हवामाना आधारित विमा योजनेच्या निकषामध्ये शेतकरी बसत असताना ही विमा रक्कम परतावा दिला जात नाही आहे.
या हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत समाविष्ट महसुल मंडळात दोन ते तीन गावात हवामान बदलाची नोंद करणारी यंत्रणा उभारलेली असते त्यामुळे प्रत्यक्षामध्ये महसुल मंडळात साठ ते सत्तर गावे असतात तेथे अनेकदा हवामान बदल होतो परंतु यंत्रणेच्या गावात हवामान बदल झाला नसल्यास त्याची नोंद होत नाही त्यामुळे हि यंत्रणा जास्तीत जास्त गावात उभारणे गरजेचे आहे. त्याच बरोबर हवामान बदलामुळे होणा-या नुकसानीची टक्केवारी प्रमाण हे लगतच्या मंडळांमध्ये नुकसान सारखेच असूनही बदलेले असते त्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होते यंदाच्या फळपिक विमा योजनेचा १५ मे २०२३ चा कालावधी संपल्यानंतर १५ दिवसात हि प्रक्रिया सुरु होणे गरजेचे असते परंतु आता सहा महिने झाले तरी अद्यापही विमा कंपनीने विमा वाटपाच्या संदर्भात हालचाली सुरू केल्या नसल्याचे शेतक-यांनी सांगितले.एकीकडे फलधारणा कमी तर दुसरीकडे हवामान बदलाचा फटका यामुळे शेतकरी दुहेरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे फळपिक विमा कंपनीने विमा तातडीने वितरीत करण्याची शेतक-यांनी मागणी केलेली आहे.
त्यामुळे परतावा मिळेल अशा अपेक्षेत बागायतदार होते परंतु पुढील हंगामाचा विमा हप्ता भरण्याची वेळ आली तरीही परतावा न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्हयातील महसुल व कृषी मंडळांच्या कार्यक्षेत्रानुसार ही योजना राबवली गेली. त्यामध्ये काही महसूल मंडळातील हवामान विषयक विमा कंपनीचा ट्रिगर कार्यान्वित झाला नसल्याने भरपाईच्या निकषांची पुर्तता झाली नसल्याने त्यासंदर्भातील नोंदी झाल्या नसल्याने केवळ ठरावीक मंडळातील काजू,आंबा बागायतदार शेतकर्याना विम्याचा लाभ हफ्ता भरूनही केवळ कृषी विभाग व विमा कंपनी यांच्यातील समन्वयअभावी मिळालेला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.