रत्नागिरी :- कोकणातील मुख्य उत्पादन असलेले आंबा आणि मत्स्य व्यवसाय अखेरच्या टप्प्यात आले आहेत. यावर्षी आलेल्या कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे आंबा आणि मच्छी हे दोन्ही व्यवसाय पूर्णतः अडचणीत सापडले. व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून आता नव्या हंगामाकडे आंबा आणि मच्छि व्यावसायिकांच्या नजरा लागून राहील्या आहेत.
पर्ससिन मासेमारीवर लागू केलेले निर्बंध आणि परराज्यातील बोटींचे आक्रमण यामुळे मासेमारी व्यवसाय आधीच अडचणीत सापडला होता. पर्ससिन बंदीमुळे मत्स्य उत्पादनात मोठी घट झाली. अशातच कोरोनाचा मोठा फटका मासेमारी व्यवसायाला बसला. व्यवसाय काही अटींवर सुरू झाला मात्र याच दरम्यान वातावरण बिघडल्याने मच्छिमारी ठप्पच होती. यावर्षी पंचवीस ते तीस कोटींचे व्यवहार पूर्णत: ठप्प झाल्याचे बोलले जात आहे. खलाशी आणि इतर सर्व खर्च बोट मालकांच्या अंगावर पडले आहेत. याचा विचार राज्य शासनाने करावा अशी मागणी करण्यात आली.
मत्स्य व्यवसायाप्रमाणे आंबा व्यवसायाची देखील हिच परिस्थीती आहे. यावर्षी थंडीचा हंगाम वेळेत सुरू झाला. हापूसच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले. यामुळे यावर्षी हापूसच विक्रमी उत्पादन होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र कोरोनाने बागायतदारांचे गणित पुरते बिघडवले. मुंबई आणि पुण्यात ऐन हंगामात कोरोनाचा फैलाव वाढला. यामुळे उत्पादन हाताशी असताना देखील पाठवण्यावर मर्यादा आल्या. मध्यंतरी बदललेले वातावरण यामुळे हापूसवर थ्रीप्स आणि तुडतुडे असे रोगही पडले. यातून पीक वाचवताना बागायतदारांची पुरती दमछाक झाली.