आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीला खो

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया काही दिवसांपुर्वी पुर्ण झाली आहे. मात्र जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या लक्षात घेऊन बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले जाणार नाही, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. तसेच कार्यमुक्तसाठी कोणीही गैरप्रकार करत असेल तर संबंधितांवर कारवाईचा इशाराही जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.

ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय 7 एप्रिल 2021 नुसार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया राज्यस्तरावर पूर्ण करण्यात आली आहे. आंतरजिल्हा बदली झालेल्या 346 शिक्षकांची यादी रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयाला प्राप्त झालेली आहे. त्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याकरिता सर्वस्तरावरून विचारणा केली जात आहे. तसेच काही घटकांकडून आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांकडून कार्यमुक्त करण्याकरिता आर्थिक व्यवहार किंवा गैरप्रकार होत असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरु आहे. त्याची गंभीर दखल जिल्हापरिषद प्रशासनाने घेतली आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी एका पत्रकाद्वारे सर्व शिक्षकांना सतर्क केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक रिक्त पदांची संख्या जास्त असल्यामुळे सद्यःस्थितीत कोणत्याही परिस्थितीत आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार नाही. याउप्पर काही घटकांकडून आर्थिक व्यवहार किंवा गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधितांविरूध्द कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधितांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.

नवीन शिक्षकांना नियुक्तीची प्रतिक्षा

जिल्हापरिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. 1 हजार 68 नवीन शिक्षकांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे करण्यात आली आहे. त्यांची कागदपत्रे पडताळणी करण्यात आली असून नियुक्तीसाठी समुपदेशन प्रक्रिया लवकरच घेण्यात येणार आहे. त्याची नवीन उमेदवारांना प्रतिक्षा आहे. रिक्त असलेल्या सुमारे दोन हजार पदांपैकी 1 हजार 12 जणांची कागदपत्र पडताळणी पुर्ण झाली आहे.