रत्नागिरी:- आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र शिक्षकांना एप्रिल, मे 2023 मध्ये बदलीच्या ठिकाणी सोडावे असे आदेश आले आहेत. जिल्ह्यात 2017 पासून 727 शिक्षक बदलीसाठी पात्र ठरलेले आहेत. त्यांना परवानगी देताना सेवाज्येष्ठता यादी तयार करुन प्रशासकीय गरज लक्षात घेण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना सोडले तर जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या 1 हजार 859 होणार आहे.
शैक्षणिक गुणवत्तेत रत्नागिरी जिल्हापरिषद राज्यात तिसर्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षात शिक्षक भरती अभावी रिक्त पदे वाढत आहे. जिल्ह्यात 2 हजार 594 प्राथमिक शाळांमध्ये 7 हजार 232 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यातील 1 हजार 132 पदे रिक्त असून 6 हजार 100 शिक्षक कार्यरत आहेत. दहा टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने आणि कोरोनातील परिस्थिती यामुळे चार वर्षे आंतरजिल्हा बदल्या झाल्या नाहीत. दरवर्षी बदल्यांसाठी यादी बनवली जात होती; पण त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे 2017 पासून आतापर्यंत मागील वर्षांपर्यंतचे सुमारे 364 शिक्षक प्रतिक्षेत आहेत. सध्या जिल्हा परिषदेत एकुण शिक्षकांची 14 टक्के पदे रिक्त आहेत. यंदा आंतर जिल्हा बदली प्रक्रिया झाली; त्यात 407 शिक्षक पात्र ठरले. रिक्त पदांची संख्या अधिक असल्याने शिक्षकांना सोडलेले नाही. त्या शिक्षकांना शासनाने दिलासा दिला. त्यामुळे 727 शिक्षकांचे भले होणार आहे. एप्रिल, मे या दोन महिन्यांमध्ये शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याची परवानगी जिल्हा परिषद प्रशासनाने द्यावी असे आदेशात नमुद केले आहे. यावर कार्यवाही करताना वर्षनिहाय सेवाज्येष्ठता यादी तयार करुन प्रशासकीय गरज लक्षात घेऊन बदलीच्या ठिकाणी शिक्षकांना सोडा असे सांगितले आहे. आंतरजिल्हा बदलीने शिक्षक जिल्हा सोडून गेले तर रिक्त पदांचा मोठा खड्डा तयार होणार आहे. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होणार आहे. याबाबत अनेक माजी पदाधिकार्यांनी आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना सोडू नये अशी विनंती प्रशासनाला केली आहे.