आंजर्ले, दाभोळसह जयगड खाडीत गोबिडच्या २१ प्रजाती

कांदळवन कक्षांकडून संशोधन; कोकणातील २५ खाड्यांमध्ये अभ्यास

रत्नागिरी:- आंजर्ले, दाभोळ, जयगड, काजळी सारख्या कोकणातील लहान-मोठ्या खाड्या, नदी पात्रांसह २५ क्षेत्रांच्या अभ्यासात वैशिष्ठ्यपूर्ण अशा गोबिड माशांच्या २१ प्रजातींची नोंद झाली. त्यामध्ये भारताच्या पश्चिम किनार्‍यावर प्रथमच नोंद झालेल्या ७ प्रजातींचा समावेश आहे. या संशोधनामुळे विविध प्रकारची मत्स्यसंपत्ती कोकणातील नद्या, खाड्यांमध्ये असून त्याचा उपयोग पर्यटनासाठीही करता येणार आहे.

वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमार्फत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) केले. यामुळे खारफुटी आणि खाडीपात्रातील गोबिड माशांच्या विविधता आणि अधिवासाचा अभ्यास करण्यात आला. या संशोधन प्रकल्पांतर्गत बीएनएचएसने जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीत विविध खाड्या, नद्यांचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये २५ स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात लहान-मोठ्या खाड्या, मडफ्लॅट्स, कांदळवन आणि संबंधित अधिवास यांचा समावेश आहे. सर्वेक्षण केलेल्या काही प्रमुख खाड्यांमध्ये ठाणे खाडी, पनवेल, धरमतर, कुंडलिका, सावित्री, आंजर्ले, दाभोळ, जयगड, काजळी, वाघोटण, कराळी या खाड्या आणि इतर अनेक लहान-मोठ्या खाड्यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील गोबिड माशांच्या विविधतेवर प्रथम आधारभूत माहिती निर्माण केली आहे. त्यामुळे कांदळवनांच्या परिसंस्थेतील मत्स्यविविधतेचा एक प्रमुख घटक असलेल्या माशांच्या श्रेणीच्या ज्ञानातील एक मोठी तफावत भरून निघाली आहे. भारताच्या पश्चिम किनार्‍यावरून प्रथमच नोंद झालेल्या प्रजातींच्या ७ नवीन नोंदी या अभ्यासात देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाचे नेतृत्व बीएनएचएस मधील मत्स्यशास्त्रज्ञ उन्मेष काटवटे यांनी केले आहे.

संशोधनात विशिष्ठ पध्दतीचा वापर

गोबिड मासे हा माशांचा एक प्रतिष्ठित गट आहे. ज्यांच्या प्रजाती ओळखणे अत्यंत कठीण आहे. बहुतेक प्रजाती वरवर सारख्याच दिसतात. Integrative  taxonomic पद्धतीचा वापर करून या नवीन अभ्यासाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील गोबिड माशांच्या प्रजातींची पहिली माहिती समोर आणली आहे. या नवीन अभ्यासामुळे महत्त्वाच्या गोबी मत्स्य क्षेत्राचे वर्णन करण्यास मदत होईल आणि कांदळवनांच्या जैवविविधतेसाठी संवर्धन उपक्रमांना प्राधान्य देण्यात मदत होईल, असे अभ्यासक श्री. काटवटे यांनी सांगितले.