रत्नागिरी:-असनी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ दाखल झाले. त्याच्या प्रभावाने कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन कोकण किनारपट्टी भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. त्यानुसार किनारी भगातील नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
अंदमान आणि निकोबार बेटांकडे वादळ सरकल्यानंतर असनी चक्रीवादळ अंदमान द्विपसमुहाच्या पश्चिमेला सुमारे 380 किलोमीटर वायव्येकडे सरकले. सोमवारी पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले. त्यामुळे सोमवारी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यात पाऊस सदृशस्थिती निर्माण होऊन काही भागात पावसाची शक्यता आहे. हा प्रभाव शनिवारपर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
बंगालच्या उपसागरात उद्भवलेल्या ‘असनी’ चक्रीवादळाचा प्रभाव कोकणात थेट जाणवणार नसला तरी अद्याप त्याचा प्रवासाची दिशाही निश्चित झालेली नाही. मात्र, त्याच्या प्रभावाने पावसाळी वातावरण तयार होणार आहे. तसेच असनीने निर्माण झालेल्या वातावरणीय स्थितीने कोकणात पूर्वमोसमी पावसासाठी पोेषक वातावरण तयार होण्यास बळकटी मिळणार आहे. त्यामुळे मोसमी पावसाचा प्रवासही सुकर होईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने आपल्या हवामान संदेशात नमुद केला आहे.
गेले दोन दिवस वाढलेला उकाडा पावसाळी स्थितीने आलेल्या मळभयुक्त वातावरणाने किंचित कमी होऊन तापमानात सोमवारी एक अशांची घट झाली. सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी 30 अंश तर दुपारी तापमान एका अंशाने वाढ होऊन 31 अंश सेल्सिअयसकडे सरकले होते.