अशैक्षणिक सर्वेक्षणाचे काम प्राथमिक शिक्षकांकडून काढून घ्या; प्राथमिक शिक्षक समितीची मागणी

रत्नागिरी:- शैक्षणिक सर्वेक्षणाच्या नावाखाली अशैक्षणिक सर्वेक्षणाचे काम प्राथमिक शिक्षकांकडून काढून घेण्याबाबतचे निवेदन प्राथमिक शिक्षक समिती पदाधिकार्‍यांच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांना देण्यात आले. याचवेळी प्रशासनाच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरून सर्व प्राथमिक शिक्षक बाहेर पडत असल्याचे आणखी एक निवेदन पुजार यांना देण्यात आले.

नवभारत साक्षरता कार्यक्रम सर्वेक्षणाचे काम अशैक्षणिक असल्याने त्यावर प्राथमिक शिक्षकांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. निरक्षर सर्वेक्षण, त्यातून बांधकाम कामगारांची माहिती जमा करण्याचे अशैक्षणिक काम प्राथमिक शिक्षकांचे नाही. त्यामुळे या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही अशैक्षणिक कामासाठी प्राथमिक शिक्षकांचा वापर केला जाऊ नये, अशी मागणी समिती पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रशासकीय व्हॉटसअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून निरंतर माहिती, परिपत्रके, विविध नमुने, आदेश, घ्यावयाच्या परीक्षा यांचे ते पद, विविध पत्र पाठविले जातात. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती संकलित केली जाते. वेळी-अवेळी सातत्याने माहिती मागवून दुसर्‍या दिवशी तपशील सादर करण्याचे आदेश दिले जात आहेत. अत्यल्प वेळेत मोठे काम करणे शक्य नाही. प्रशासनामार्फत कोणतीही सुविधा प्राथमिक शिक्षकांना पुरविली जात नाही. शिक्षकांचे सामाजिक, मानसिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम केले जात आहे. वैयक्तिक मोबाईलचा वापर अशा कामांसाठी करणे प्राथमिक शिक्षकांना यापुढे शक्य नसल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.