अव्वाच्या सव्वा कर्ज वसुली प्रकरणी सावकारांविरोधात लवकरच दोषारोपपत्र

रत्नागिरी:- आर्थिक अडचणीत सापडलेल्या ज्या गरजूंनी सावकारांकडून कर्ज घेतले, त्या गरजूंकडून अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करण्यात आले. अशा काही सावकारांना अटक होऊन त्यांची पोलिस कस्टडी, न्यायालयीन कस्टडी अशी वारी होवून जामीन मंजूर झाला आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात दाखल व्हावे, या दिशेने शहर पोलिसांनी वेगवान तपास सुरू केला आहे.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेकांनी आरोपी निलेश कीर याचेसह इतर काही सावकारांकडून कर्ज घेतली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्जदारांकडून सहीचे बॉण्ड, कोरे चेक घेण्यात आले. कर्जाची रक्कम फेडूनही दिलेल्या बॉण्ड पेपर आणि कोऱ्या चेकचा दुरूपयोग करून कर्जाची रक्कम वाढवून दाखवण्यात आली. या वाढीव रकमेच्या मागणीसाठी सावकारांकडून तगादा लावण्यात आला. इतकेच नव्हे तर या वाढीव रकमेची मागणी कराना ठार मारण्याची धमकीही देण्यात आल्याची तक्रार कर्जदारांकडून करण्यात आली. त्यानुसार शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

आरोपींना अटक केल्यानंतर झालेल्या तपासात कर्जदारांची वाहने ताब्यात घेणे, जागा नावावर करून घेणे यासह महिलांच्या संदर्भात घृणास्पद प्रकार झाल्याचे पुढे आले. पोलिसांनी अशा काही गाड्या ताब्यातही घेतल्या. ही वाहने पुन्हा ताब्यात मिळावीत यासाठी संबंधीत कर्जदारांसाठी जामीनदारांकडून विनंती करण्यात आली. असलेल्या न्यायालयाला या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांकडून या वाहनांच्या मालकांची सखोल माहिती घेवून ती ज्यांची आहेत त्यांना मिळावीत यासाठी न्यायालयाला सकारात्मक म्हणणेही देण्यात आले आहे. मात्र आता उर्वरित तपास वेगाने होवून आरोपींची दोषारोप पत्र लवकरात लवकर न्यायालयात दाखल व्हावी यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.