अवकाळी पावसाने रत्नागिरी जलमय

रत्नागिरी:-अवकाळी पावसाने रत्नागिरीला चांगले झोडपून काढले आहे. मंगळवारी दुपारी सुरू झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण रत्नागिरीत दाणादाण उडवली. शहरात गोखले नाका परिसरात गुडघाभर पाणी रस्त्यावर असल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली होती.परतीचा पाऊस होऊन गेला हिवाळ्याचे दिवस सुरू झाले मात्र कोकणात अवकाळी पावसाने अक्षरशः हैदोस घातला आहे. दोन दिवसांपूर्वी कोसळलेला अवकाळी पाऊस सोमवारी एक दिवसाची विश्रांती घेऊन थांबला होता. मात्र मंगळवारी दुपारी नंतर पुन्हा वातावरणात अचानक बदल झाले आणि धो धो पाऊस कोसळायला सुरुवात झाली या पावसाचा जोर मोठा असल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

दुपारनंतर कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे रत्नागिरी शहरातील राम आळी गोखले नाका आदी भागात गुडघाभर पाणी रस्त्यावरून वाहत होते काही दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली होती तर अनेक वाहने रस्त्यात बंद पडली होती. राहटाघर, मारुती मंदिर स्टेडियमच्या मागील बाजूस पावसाळा प्रमाणे पाणी साचले होते.

अचानक अवकाळी पाऊस सुरू झाल्याने रत्नागिरीत अनेक भागातील बत्ती गुल झाली होती रात्री उशिरापर्यंत अनेक भाग अंधारात होते गडगडाटासह अवकाळी पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांचं आंबा बागायतदार देखील आता चिंताग्रस्त झाले आहेत भुकंपा पाठोपाठ अवकाळी पाऊस सुरू झाल्याने ऋतू याचा विसर देखील आता साऱ्यांना पडू लागला आहे