रत्नागिरी:- अवकाळी पावसाचे संकट अजुनही कायम असल्यामुळे आंबा बागायतदारावराची त्रेधातिरपीट उडालेली आहे. पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील आंब्याला फळमाशीचा त्रास होत असून डागी फळांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे मुंबई बाजारातील दरांवरही परिणाम झाला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवडयापर्यंत स्थिर राहीलेले दर कमी झाले आहेत. त्यामुळे हापूस आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागला आहे.
यंदा अवकाळीने हापूसचा पिच्छा सोडलेला नाही. यावर्षी प्रतिकुल वातावरणाने आब्ंयाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता होती. त्यानुसार किमान 60 टक्के उत्पादन हाती लागण्याचा अंदाज होता. त्यामुळे थोडक्यात गोड असे या हंगामाचे वर्णन करण्यात येत होते. मात्र आता मे महिन्यातच अवकाळीने कोकण किनारपट्टी भागातील हापूसच्या पट्ट्याला ग्रहण लावले आहे. मे महिन्यातील प्रमुख आणि मुख्य हंगामाताच अवकाळीने हजेरी लावून आंब्याचा उरला सुरला हंगाम संपुष्टात आणल्याची भीती बागायतदारांमध्ये आहे.
आंब्याचा महत्त्वाचा आणि शेवटचा हंगाम मे महिन्यातच सुरू होतो. या कालावधीत गावाकडे जावून हापूसची चव चाखण्यासाठी चाकरमानी गावी येतात. मात्र आता मे महिन्यात झालेल्या अवकाळीने या उरल्या सुरल्या हंगामाचाही बट्ट्याबोळ केल्याची भावना बागायतदारांत आहे. गेले दोन दिवस रत्नगिरीसह अन्य भागात पाऊस झाला. पावसाने हे आंबा भिजल्याने फळमाशीचा त्रास होण्याची भिती बागायतदारांमध्ये आहे. पाऊस पडल्यानंतर मुंबईतील दर एक हजार रुपयांनी कमी झाले आहेत. मे महिन्यामध्ये पाच डझनच्या पेटीला 3500 रुपये दर मिळत होता. आता तोच कमी झाला असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक खरेदीला बाहेर पडणार आहे. शेवटच्या टप्प्यात खरेदीसाठी झुंबड उडणार आहे.
दरम्यान, उत्पादन कमी असल्याने कॅनिंगचे दर किलोला 65 रुपये मिळत आहे. मुंबईतील पेटीचा दर कमी झाल्यामुळे अनेक बागायतदार आता कॅनिंगकडे वळण्याची शक्यता आहे.
मुंबईमधील हापूसचे दर कमी झाले असून सध्या पाच डझनच्या पेटीचा दर पंधराशे ते दोन हजार रुपये इतका मिळत आहे. पावसामुळे दरावर परिणाम झाला आहे. सध्या अवकाळीमुळे डागी आंबा असून कॅनिंगचे दर चांगले आहेत.
- राजेंद्र कदम, आंबा बागायतदार