रत्नागिरी:- मासू गावातील अल्पवयीन मुलीने विवाह केला मात्र, विवाह होऊन १५ दिवसात ती युवती पाच महिन्यांची गर्भवती असल्याची बाब समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत गुहागर पोलिस स्थानकात अज्ञात व्यक्तीवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुहागर तालुक्यातील मासू गावातील अल्पवयीन मुलीची चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हणे येथील तरुणाने ती अल्पवयीन असूनही घरगुती पद्धतीने विवाह केला. विवाह झाल्यानंतर १५ दिवसांनी तिच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे तिच्या सासरकडच्या मंडळींनी तिला उपचारासाठी रत्नागिरी येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.
यावेळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने ही मुलगी पाच महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले. विवाहाला १५ दिवस झाले नाही तोच ती पाच महिन्यांची गर्भवती कशी, असा सवाल मुलाच्या घरच्या मंडळींनी निर्माण केला आहे. यामुळे आधीच मुलगी अल्पवयीन व त्यात पुन्हा पाच म्हणजे गर्भवती त्यामुळे प्रकरण रत्नागिरी पोलिस स्थानकात दाखल झाले.
गुहागर पोलीस स्थानकात हा गुन्हा वर्ग झाला असून गर्भवती करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर पोस्को दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित मुलीला रत्नागिरी बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शेंडे करत आहेत.