खेड:- तालुक्यातील एका गावात अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रशांत कमलाकर बनकर (४०, रा. टिटवाळा- कल्याण, मुंबई) या नराधमास येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही घटना १५ मे २०१३ रोजी घडली होती. सरकारी पक्षातर्फे अॅड. मृणाल जाडकर यांनी काम पाहिले.
यातील नराधम हा पीडित युवतीच्या घराशेजारी राहणाऱ्या लोकांकडे कार्यक्रमासाठी चालक म्हणून मुंबईवरून आला होता. वाहनातील व्यक्ती कार्यक्रमांमध्ये व्यस्त असताना त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून नराधमास अटक केली होती.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेची साक्ष व कागदोपत्री पुरावा ग्राह्य धरत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने नराधमास ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. २० हजार रुपयांच्या दंडाचाही समावेश असून दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.