खेड:- खेड तालुक्यातील सोनगाव- ब्राह्मणवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला 20 वर्षांची सक्तमुजरी न्यायालयाने ठोठावली आहे. या खटल्याचा निकाल अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश डी.एल. निकम यांनी गुरुवारी दिला. आरोपीला 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. रोशन रामचंद्र खेराडे (रा. सोनगाव, ब्राहमणवाडी) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना 15 सप्टेंबर 2020 रोजी घडली होती.
अल्पवयीन मुलगी दळण घेउन घरी आली असताना एकटेपणाचा गैरफायदा घेवून घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस स्थानकात दिली होती. त्यानुसार नराधमावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन न्यायालयात खटला चालू झाला होता. या खटल्याची सुनावणी काल पूर्ण झाली. यावेळी 15 साक्षीदार तपासण्यात आले. सबळ पुरावा आणि अॅड. मृणाल जाडकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. शिवाय 25 हजार रुपयांची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याकामी पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्यासह पैरवी अधिकारी आलीम शेख, अजय ईदाते यांचे सहकार्य लाभले.