रत्नागिरी:- तालुक्यातील देवरुख परिसरातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी संबंध प्रस्थापित केेेले. यातून ती गर्भवती राहिल्यावर तिला मित्राच्या मदतीने गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. याप्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सोमवारी 10 वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आरोपीच्यावतीने अपील दाखल केले असून त्यातील जामीन अर्जावर सुनावणी झाली असता आरोपीला 15 हजारांचा जामीन मंजूर झाला आहे. आरोपीच्या वतीने ऍड राकेश भाटकर यांनी काम पाहिले.
ही घटना 4 जानेवारी 2019 ते 5 एप्रिल 2019 या कालावधीत घडली आहे. सौरभ सुनिल पागार (23,रा.पाटगाव संगमेश्वर,रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर सौरभला या गुन्ह्यात गर्भपाताच्या गोळ्या आणून देणारा त्याचा मित्र बेलाराम उर्फ विकि दलाराम देवाशी (24,रा.राजस्थान) याची गुन्हा सिध्द न झाल्याने मुक्तता करण्यात आली. याबाबत पिडीतेच्या नातेवाईकांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानुसार,सौरभ आणि पिडीतेमध्ये मैत्रीचे संबंध होते. यातूनच त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गर्भवती राहिली. सौरभला हे समजताच त्याने मित्र बेलारामच्या मदतीने पिडीतेला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला.
दरम्यान, ही बाब पिडीतेच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी तातडीने याबाबत देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.देवरुख पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अस्मिता पाटील यांनी सौरभवर भादंवि कलम 376,(2), (जे), (एन) ,312,201,34 आणि पोक्सो कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला.तसेच त्याचा मित्र बेलारामवर गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी भादंवि कलम 201,34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.गेली दोन वर्षे हा खटला न्यायालयात सुरु होता या खटल्याचा निकाल देताना न्यायाधिश व्ही.ए.राऊत यांनी दोन्ही बाजुचा युक्तीवाद व दाखल केस लॉ विचारात घेउन भादंवि कलम 376 नुसार सौरभला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड तो न भरल्यास 1 वर्षे सक्तमजुरी तसेच पोक्सो कलम 3 व 4 नुसार 7 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड तो न भरल्यास 1 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती.
या प्रकरणात शिक्षेविरुद्ध अपिल दाखल केले असून त्यामध्ये जामीन मिळावा यासाठी सौरभ पागार याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. जामिनासाठी ऍड. राकेश भाटकर यांच्यामार्फत अर्ज दाखल केला. त्यावर न्यायमूर्ती रेवती डेरे- मोहिते यांच्यासमोर सुनावणी झाली असता 15 हजार रुपयांचा जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.