रत्नागिरी:- अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील टेम्पोवरील क्लिनरला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीस सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा येथील जादा सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी आज सुनावली. यशवंत राजाराम मेणे (वय ४६, रा. अरवली. ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. २०१५ मध्ये पन्हाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती.
विशेष सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पन्हाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात दूध संघास दूध देण्यासाठी टेम्पो येत होता. त्या टेम्पोच्या क्लिनरने तेथील एका घरातील अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. ही माहिती मुलीने घरी दिली. कुटुंबीयांनी तातडीने परिसरात पाहिले, तेव्हा आरोपी मेणे तेथून गडबडीने जात होता. त्याला अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी थांबवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता तो ‘काही नाही.. काही नाही..’ म्हणून तेथून पळून गेला.
याबाबत पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. भारतीय दंड विधान संहिता कलम ३५४ (अ)(ड) सह बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम १० प्रमाणे गुन्हा नोंद झाला. खटल्यात विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी सात साक्षीदार तपासले. फिर्यादी, पीडित मुलगी व इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. दोन्ही बाजूंचा युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम पीडितांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
ॲड. कुलकर्णी यांना पन्हाळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन हेड कॉन्स्टेबल पी. जे. भवारी, सहाय्यक महिला पोलिस निरीक्षक मीना जगताप, कळे पोलिस ठाण्याचे पैरवी अधिकारी पोलिस हेड कॉन्स्टेबल सागर माने, पोक्सो पैरवी अधिकारी पोलिस हेड कॉन्स्टेबल माधवी घोडके आदींनी सहकार्य केले.