माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह पत्नीची पाच तास चौकशी

रत्नागिरी:- उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते, कुडाळचे माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची मंगळवारी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुन्हा चौकशी झाली. या दाम्पत्याची मंगळवारी पाच तास चौकशी झाली. यावेळी अपसंपदेच्या चौकशीच्या अनुषंगाने नाईक दाम्पत्याने केली विविध कागदपत्रे सादर करून घेण्यात आली.

वैभव नाईक यांची अपसंपत्तीच्या आरोपाखाली चौकशी सुरू आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी एसीबीच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी देखील वैभव नाईक व त्यांच्या पत्नीने माहिती दिलेली आहे. त्यानंतरही या चौकशीचा ससेमिरा अजूनही संपलेला नाही. नोटीस काढून या दाम्पत्याला आज पुन्हा चौकशीला बोलावण्यात आले. याबाबत प्रतिक्रिया देताना वैभव नाईक म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी ज्या फॉरमॅटमध्ये माहिती मागितली होती ती देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी वेगळ्या पद्धतीने माहिती मागितली ते घेऊन आम्ही आलो आहे. सध्या सुरू असलेली ही चौकशी त्रास देण्यासाठी असू शकते.

ज्या लोकांच्या चौकशी सुरू आहेत आणि त्यांनी पक्षांतर केल्यानंतर त्यांची चौकशी थांबली आहे. दरम्यान मी टॅक्स यापूर्वीपासून भरत आहे आणि त्याची माहिती देखील मी दिलेली आहे. माझी पत्नी देखील या चौकशीला सामोरे जाईल. ही लढाई माझी मला एकट्याला लढायची आहे, अशी देखील प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली.