अपक्ष उमेदवार शकील सावंत करोडपती; संपत्ती २७ कोटींच्या घरात

प्रतिज्ञापत्रात दिली माहिती; आलिशान हॉटेलचाही समावेश

रत्नागिरी:- रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या जागेसाठी पहिल्याच दिवशी अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी वाजतगाजत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, सावंत यांची संपत्ती सुमारे २७ कोटी ३३ लाखाच्या दरम्यान आहे. यामध्ये आलिशान गाड्या, हॉटेल, फिक्स डिपॉझिट, जमीन, घर, ज्वेलरी, बँक खात्यातील पैसे आदींचा समावेश आहे. त्यांच्या आलिशान सावंत पॅलेस हॉटेलचे बाजारमूल्य साडेसव्वीस कोटींच्या दरम्यान आहे.

शकील सावंत यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या संपत्तीची माहिती उघड केली आहे. सावंत यांच्या कार, दुचाकी अशा आठ गाड्यांची किंमत सुमारे १ कोटी ३३ लाखांच्या दरम्यान आहे. बँकखाते, चार्टर्ड अकाउंट, फिक्स डिपॉझिट आदींचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर १६ लाख ९४ हजार एवढे कर्ज आहे.

प्रॉपर्टीमध्ये हॉटेल सावंत पॅलेस हे त्यांच्या मालकीचे असून, त्याचे बाजारमूल्य २६ कोटी ५० हजार आहे. दांडेआडोम येथे ९ लाखांचे गोडावून आहे. कोंडिवरे येथे २० लाखांचे घर आहे. शिरगावमध्ये ५४ लाख ४५ हजारांची जमीन आहे तर ज्वेलरी २५ लाख ४९ हजारांची असून, रोख रक्कम २ कोटी १० लाख ५०० रु. अशी एकूण मिळून सुमारे २७ कोटी ३३ लाखांची सावंत यांची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रानुसार स्पष्ट झाले आहे.