लांजा तालुक्यातील कोट गावातील कातळशिल्प उजेडात; निसर्गयात्री संस्था, ग्रामस्थांची मेहनत
रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील कोट गावातील ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून अश्मयुगीन कातळशिल्प उजेडात आली आहेत. यासाठी ग्रामस्थांबरोबरच रत्नागिरीतील निसर्गयात्री संस्थेच्या सदस्यांनी मेहनत घेतली असून, रत्नागिरीच्या शीरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ शांताराम उर्फ आबा सुर्वे यांनी येथे कातळशिल्पासारखी कलाकृती असल्याचे निसर्गयात्री संस्थेला कळवले होते. याची पाहणी करण्यासाठी जानेवारी महिन्यात निसर्गयात्री संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी पाहणी केली. सरपंच संजय पाष्टेे आणि ग्रामस्थांसोबत गावच्या जवळच्या सड्यावर शेतीचे दळे, मांगर, भाताच्या उडव्या, गवताच्या वरंडी, लाकडाच्या मोळ्या अशा गोष्टीने व्यापलेला परिसरातच ही कातळशिल्पे अस्तिव दाखवत होती. खूप मोठ्या प्रमाणात आणि कित्येक वर्ष मानवी हस्तक्षेप या परिसरात होता. या सर्वांतून कातळशिल्प शोधून ती संरक्षित करणे म्हणजे खूपच मोठे आव्हान होते. पण गावाचे सरपंच आणि गावकर्यांनी निसर्गयात्री संस्थेच्या हाकेला प्रतिसाद दिला.
सर्वांच्या सोयीचा दिवस ठरवून कातळशिल्प साफसफाई मोहीम ठरवण्यात आली. यासाठी निसर्गयात्री संस्थेचे सुधीर उर्फ भाई रिसबूड, धनंजय मराठे, केदार लेले, मकरंद केसरकर, अजिंक्य प्रभुदेसाई, विजय हटकर, सायली खेडेकर, राहुल नरवणे गावात पोहचलो. यावेळी तेथील पन्नासहून अधिक ग्रामस्थही उपस्थित होते. कामाची रूपरेषा, काय करायचे आहे आणि काय करायचे नाही याबाबत त्यांना माहिती देण्यात आली. भाताच्या उडव्या, गवताच्या वरंडी, भराभर बाजूला होऊ लागल्या, परिसरात पसरलेली माती आणि अन्य बाबी बघता बघता बाजूला झाल्या. एकावेळी 100 पेक्षा अधिक हात काम करत होते. एक एक करत कातळशिल्प आपले अस्तित्व दाखून लागले. टप्याटप्याने 2.5 फूट लांबीपासून 7 फूट लांबीपर्यंतचे विविध प्रजातीतील मासे, 6 फूट लांबीची घोरपडी सदृश्य आकृती, विविध प्रजातींचे प्राणी, पक्षी, मोठ्या आकाराची चौकोनी उठावाची रचना आणि काही अनाकलनीय तसेच लहान आकाराच्या भौमितिक रचना अशा 30 पेक्षा अधिक खोद चित्र रचनांचा समूहच उजेडात आला. गावकर्यांना काहीतरी आहे याची कल्पना होती. पांडव कालीन काहीतरी असावे असा त्यांचा याविषयी समज होता. या परिसरात आणखीही चित्र रचना असाव्यात अशी शक्यत वर्तवण्यात येत आहे.
वैशिष्ट्यपूर्ण रचनेची कातळशिल्पे
या समूहातील वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणजे 3 फूट लांबीपासून 18 फूट लांबी पर्यंतच्या शिकारी पक्षांच्या रचना लक्षवेधक आहेत. पक्षाच्या डोक्यावरील आकर्षक तुरा, मजबूत पाय, 6 इंच लांबीच्या नख्या यावरून या पक्षाची भव्यता जाणवते. त्याच बरोबर तब्बल 23 फूट लांब व 10 फूट उंचीच्या गवा रेड्याची चित्ररचना एका नजरेत मावत नाही. या गवा रेड्याची 2 फूट लांबीची वक्राकार शिंगे पाहिल्यानंतर नंतर त्याच्या ताकदीची कल्पना आपण करू शकतो. या सर्वांसोबत असलेली 12 फूट लांब व जवळपास तेवढीच रुंद भौमितिक रचना लक्ष वेधून घेते.