रत्नागिरी:- दरवर्षी आंबा हंगामात कोकणातील हापूस आंब्यासोबत इतर राज्यातील आंबादेखील मोठ्या प्रमाणात दाखल होतो. इतर राज्यातून आलेल्या आंब्याची ‘हापूस’ या नावाने विक्री केल्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी पुणे आणि मुंबई बाजार समितीने परिपत्रक काढले आहे. इतर राज्यातील आंबा ‘हापूस’ नावाने विकल्यास संबंधित व्यापाऱ्याचा आंबा जप्त करून दंड, परवाना निलंबित किंवा परवाना रद्द करण्याची कारवाईदेखील करण्यात येणार आहे.
बाजार समित्यांमध्ये कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची देवगड, रत्नागिरी येथून आवक होते. त्या शिवाय केरळ, गुजरात, कर्नाटक यासह इतर राज्यातून आंबा येतो; मात्र, इतर राज्यातील आंबा आणि कोकणातील आंब्याच्या चवीत आणि सालीमध्ये फरक आहे. कोकणातील हापूस आंबा रसाळ आणि चवीस चांगला असतो. त्यामुळे कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किंमतीही जास्त असतात. याचा फायदा घेत व्यापारी, विक्रेते ग्राहकांची फसवणूक करतात. आंब्यांची अदलाबदल करून विक्री करतात. मागील वर्षीच्या हंगामाच्या सुरवातीला पुणे बाजार समितीत कर्नाटक, केरळ येथून आलेला आंबा हा ‘कोकण हापूस’ या नावाने लेबल लाऊन विक्री करतानाचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे पणन संचालकांनी याबाबत तपासणी करून कारवाईचे आदेश दिले होते.
परराज्यातील आंबा हा महाराष्ट्र राज्यात उत्पादित झालेला आहे किंवा ‘कोकण हापूस’ आहे, असे भासवून विक्री करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे याबाबत कारवाईचे आदेश बाजार समितीने दिलेले आहेत. असे प्रकार आढळून आल्यास आंबा बाजार समिती जप्त करून संबंधितावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे तसेच अडत्यांची परवानगी निलंबित किंवा रद्द करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून वाशी बाजारात ३६ हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. दिवसेंदिवस पेट्यांची संख्या वाढत असल्यामुळे दर कमी झाले आहेत. परराज्यातील आंबेही मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत.