अनधिकृत मासेमारीला चाप बसवणार ‘सीसीटीव्ही’

मत्स्य विभागाचे आदेश; जिल्ह्यात साडेतीन हजार नौकांवर बसणार कॅमेरे 

रत्नागिरी:- एलईडी दिव्यांद्वारे होणारी बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी सागरी सुरक्षेसाठी एक ते सहा सिलिंडरद्वारे मासेमारी करणार्‍या नौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश मत्स्य विभागाकडून देण्यात आले आहेत. सीसीटीव्हीमुळे मच्छीमारी कोणत्या प्रकारची जाळी वापरतात, कुठे मासेमारी करत आहेत याचीही माहिती मिळणार आहे. कॅमेरांसाठी येणारा खर्च हा मच्छीमारांना स्वतःहून करावयाचा आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मच्छीमारी नौकांना यावर कार्यवाही करावी लागणार आहे.

सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 महाराष्ट्र सागरी सागरी मासेमारी नियमन 1982 कायद्यातंर्गत मासेमारीचे नियमन करण्यात येत आहे. पर्ससीन, एलईडी, ट्रॉलिंग आदी मासेमारी पद्धतीचे नियंत्रण करण्यासाठी वेळोवेळी आदेश व अधिसूचना काढल्या जातात. अनेकवेळा परप्रांतीय मच्छीमार राज्याच्या जलधी क्षेत्रात घुसून अवैधरित्या मासेमारी करतात. तसेच स्थानिक मासेमारी नौकादेखील सागरी मासेमारी अधिनियमांचे उल्लंघन करतात. या अवैध मासेमारीमुळे काही मत्स्य प्रजाती धोक्यात आल्या आहेत. या अनुषंगाने मत्स्य विभागाकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात मासळी उतरविण्याच्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर पुन्हा 1 ते 6 सिलिंडर नौका मालकांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत असे आदेश काढण्यात आले आहेत.

सागरी सुरक्षिततेला सध्या महत्त्व प्राप्त झाले असून मच्छीमारी नौकंवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामुळे खोल समुद्रातील अन्य नौकांवर वॉच ठेवणे शक्य होणार आहे. कॅमरे बसवलेली नौका कोणत्या क्षेत्रात मासेमारी करत आहे, याची माहितीही त्याच कॅमेराद्वारे घेणे शक्य आहे. अत्याधुनिक पध्दतींमुळे मच्छीमारी नौकांचा स्वतःच स्वतःवर वॉच राहणार आहे. जीपीएसद्वारे मासेमारी नौकांवर लक्ष ठेवणे शक्य असते; परंतु अनेकवेळा त्यातूनही मार्ग काढला जातो. सीसीटीव्ही कॅमेरांच्या वापरामुळे मच्छीमारांनी केलेली मासेमारी, मासेमारी पध्दतीचे अनुपालन तसेच सागरी सुरक्षेच्या दृष्टीने जवळच्या परीसरात असणारी मासेमारी नौका इत्यादीची माहिती उपलब्ध होईल व त्यामुळे समुद्रात होणार्‍या मासेमारीवर नियंत्रण, देखरेख प्रभावीपणे राहू शकेले व अवैधपणे होणारी मासेमारी रोखण्यास मदत होईल. मत्स्य विभागाच्या आदेशानुसार मासेमारी नौकांना सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील माहिती मासेमारी करुन आल्यानंतर 15 दिवस राखून ठेवणे बंधनकारक राहणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार मच्छीमारी नौका आहेत. त्यातील साडेतीन हजार नौका 1 ते 6 सिलींडरच्या नौका आहेत. उर्वरित नौका या बिगर यांत्रिक आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे हे नौकेच्या केबीनवर लावणे आवश्यक आहे. त्यासाठी किमान खर्च अपेक्षीत असून मोठा भुर्दंड बसणार नसल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

वरीष्ठांकडून आलेल्या पत्रानुसार जिल्ह्यातील साडेतीन हजार मच्छीमारी नौकांच्या मालकांना हे आदेश पाठविण्यात आले आहेत. यंदाच्या हंगामात त्यावर अंमलबजावणी करुन सीसीटीव्ही बसवावे लागणार आहेत.– एन. व्ही. भादुले, सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी