अध्ययन सर्वेक्षणात रत्नागिरी जिल्ह्याची घसरण

रत्नागिरी:- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फेत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणात (स्लॅश) रत्नागिरी जिल्ह्याचे स्थान घसरले आहे. इयत्ता 3 री मधील मराठी भाषा विषयात रत्नागिरी जिल्हा राज्यात 32 वा तर गणितात 27 वा, इयत्ता 5 वीच्या मराठीत 27 वा तर गणितात 29 वा आणि इयत्ता 8 वीच्या मराठी विषयात 10 वा तर गणितात 30 वा क्रमांक मिळाला आहे.

विद्यार्थ्यांची अध्ययन संपादणूक पातळी तपासण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी, पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे एकाचवेळी सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशिक्षण परिषदेने घेतला होता. त्याची अंमलबजावणी 24 मार्च 2023 रोजी झाली. जिल्हानिहाय, अध्ययन निष्पतीनिहाय, क्षेत्रनिहाय, लिंगनिहाय, सामाजिक संवर्गनिहाय शाळा व्यवस्थापन इत्यादीनुसार विश्लेषण करण्यात आले. त्याचा अहवाल नुकताच जाहीर झाला. त्यानुसार पुढील शैक्षणिक नियोजन करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात इयत्ता तिसरी भाषा (मराठी) विषयात जिल्ह्याची संपादणूक टक्केवारी प्रथम भाषा या विषयात 71.77 टक्के आहे. तर राज्याची 76.99 टक्के आहे. तर गणित विषयात संपादणूक 65.93 टक्के तर राज्याची 68.5 टक्के आहे. संपादणूक पातळीनुसार विद्यार्थ्यांची मराठी विषयात टक्केवारी 75 टक्केपेक्षा जास्त पाहता राज्याची 61.54 टक्के आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याची 52.43 टक्के आहे. त्यात 30 टक्केपेक्षा कमी संपादणूक राज्य 4.95 टक्के तर रत्नागिरी जिल्हा 8.41 टक्के आहे. 31 ते 50 टक्केदरम्यान राज्याची 8.04 टक्के तर रत्नागिरी जिल्ह्याची 10.84 टक्के आहे. 51 ते 75 टक्के दरम्यान राज्य 25.47 टक्के तर रत्नागिरी जिल्ह्याची 28.32 टक्के आहे. त्याचप्रमाणे गणित या विषयांमध्ये सरासरी संपादणूक 65.93 इतकी आहे. राज्याची गणिताची सरासरी संपादणूक 68.5 टक्के आहे. 30 टक्केपेक्षा कमी संपादणुक पातळीत राज्य 8.03 टक्के तर रत्नागिरी जिल्हा 12.83 टक्के, 31-50 टक्के संपादणूकीत 14.38 टक्के, 51-75 टक्के संपादणुकीत रत्नागिरी 31.64 टक्के, 75 टक्क्यापेक्षा जास्तमध्ये 41.15 टक्के आहे. इयत्ता पाचवीची भाषा विषयाची जिल्ह्याची संपादणूक 71.77 टक्के तर गणित विषयाची 76.99 टक्के आहे. गणित विषयाची सरासरी संपादणूक रत्नागिरी जिल्ह्याची 65.90 टक्के आहे. शिक्षणाचे मूल्यांकन करणाऱ्या विविध उपक्रमात जिल्ह्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. मात्र स्लॅशमध्ये जिल्हा मागे राहीला आहे. दरम्यान, कोरोनातील परिस्थितीचा हा परिणाम असावा अशी शक्यता व्यक्त केला जात आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदांचा प्रश्न गंभीर आहे. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत असल्याचे प्रशासनानेही कबूल केले आहे.