रत्नागिरी:- मागील दोन महिन्यांपासून येथील सहायक धर्मादाय आयुक्तांची बदली झाल्यानंतर नियुक्ती झालेल्या नवीन अधिकारी रजेवर असून त्यांचा कार्यभार असणारे सिंधुदुर्गतील अधिकारीही रत्नागिरीत येत नसल्याने विविध संस्थांची शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील अनेक संस्थांची कामे खोळंबल्याने नागरिकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.
येथील सहायक धर्मादाय आयुक्तांची मे महिन्यामध्ये बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी महिला अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या अधिकारी प्रसुती रजेवर असल्याने त्यांचा चार्जही कोल्हापूर वरिष्ठ कार्यालयाने सिंधुदुर्गतील अधिकार्यांकडे सोपवला होता. सिंधुदुर्गमध्येही संस्थांची अनेक कामे असल्याने तेथील अधिकार्यांना रत्नागिरीत फार लक्ष देता येत नाही. दोन महिन्यात फक्त रुग्णालय समितीची महत्त्वाची मासिक बैठक त्यांनी घेतली.
या कार्यालयात नियमित संस्थांच्या विविध विषयांवर न्यायिक काम चालत असल्याने दररोज किमान पन्नास ते शंभरहून अधिक प्रकरणांची सुनावणी होत असते. परंतु मागील दोन महिन्यात ही सर्व सुनावणींची कामे थांबली आहे. संस्थाच्या बदल अर्ज व नोंदणी अर्जांची प्रकरणे यात सर्वाधिक आहेत.
या अर्जांची कार्यालयीन कामे होत असली तरी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे होणारी सुनावणीची कामे होत नसल्याने, मंडणगडपासून राजापूरपर्यंतच्या अनेकांना नुसत्या फेर्या माराव्या लागत आहेत.
अगदीच महत्त्वाची सुनावणी असेल तर संस्थाचालकांना सिंधुदुर्गतील अधिकार्यांकडे विनंती करुन, तारीख घ्यावी लागते व रत्नागिरी कार्यालयातील कर्मचार्याला सोबत घेऊन सिंधुदुर्ग ओरस येथील कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत. त्यामुळे रत्नागिरीत आठवड्यातून दोन दिवस तरी सहाय्यक धर्मादाय आयुक्त आल्यास प्रलंबित असणार्या कामांना गती मिळू शकते अशी मते संस्था, मंडळाच्या पदाधिकार्यांनी व्यक्त
केली.