अतिदुर्गम मंडणगडमधील राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करून दाखवला; पोलीस दलावर कौतुकाचा वर्षाव 

रत्नागिरी:- जिल्ह्यातील दुर्गम असलेल्या मंडणगड तालुक्यात सोयीसुविधांचा अभाव असतानाही पोलीस दलाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे समन्वय साधून आंबडवेतील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी यशस्वी केला आहे. प्रथमच आलेल्या राष्ट्रपतींच्या दौर्‍याचे योग्य व नीटनेटके नियोजन केल्याबद्दल राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्यासह पोलीस दलाचे कौतुक केले.

मंडणगड तालुका दुर्गम भागात वसलेला आहे. तेथे पुरेशा मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. दळणवळणांच्या साधनांसह आधुनिक तत्रज्ञान विकसित झालेले नाही. या स्थितीत देशाचे राष्ट्रपती मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावी येणार असल्याने त्यांच्या दौर्‍याची नियोजन करण्याची आव्हानात्मक जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग व त्यांच्या टीमवर होती. राष्ट्रपतींसारख्या अतिमहत्व्याच्या व्यक्तीला असलेली सुरक्षा व त्या दृष्टीने करावयाचे नियोजन हे जिल्हा पोलीस दलातील सर्वांनाच नविन होते. जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदारांसह, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई येथील अधिकारी, अंमलदार यांना या दौर्‍यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. एक हजारपेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांची मेहनत हेच दौर्‍याच्या यशस्वितेचे गमक होते. जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या अधिकारी, अंमलदार यांच्या मदतीने बंदोबस्ताचे पॉईंट निश्चित केले.

आंबडवे ते हेलिपॅड हे अंतर 22 किलोमीटर होते. रस्त्याचा दुतर्फा बंदोबस्त तैनात केला होता. विविध ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले. कार्यक्रम स्थळासह आंबडवे गावाच्या पंचक्रोशीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस पथके तैनात होती. खाडी किनार भागात स्पीड बोटींव्दारे गस्त ठेवली होती. मोबाईल कनेक्टिव्हिटी अपुरी असल्यामुळे वायरलेस यंत्रणेचा वापर केला गेला. त्यामुळे मंडणगडात उभारण्यालेल्या नियंत्रण कक्षाव्दारे सर्व पॉईंटवर लक्ष ठेवता आले. राष्ट्रपतींच्या आगमनापूर्वी दोन वेळा रंगीत ताली घेण्यात आली. त्यातील त्रुटी तत्काळ दूर केल्या गेल्या. राष्ट्रपतींचा ताफा जाणार्‍या मार्गावरुन वाहतुक बंद ठेवली गेली. नेमून दिलेल्या फिक्स पॉईंटवर अधिकारी, अंमलदार हजर आहेत का, याची तपासणी बिनतारी यंत्रणेमार्फत सुरु होती. कार्यक्रम ठिकाण, मंडणगडमधील मुख्य रस्ता आणि कार्यक्रम स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेला अत्युच्च प्राधान्य देत सुरक्षा पासही दिले गेले होते. डॉ. गर्ग यांनी स्वतः आंबडवे गावातील ग्रामस्थांशी तिन वेळा बैठक घेत सुचनाही दिल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले.

राष्ट्रपतींच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहणार नाही, यासाठी जिल्हा पोलीस दल, जिल्हा प्रशासन, होमगार्ड, बॉम्ब शोधक  पथक, डॉग स्कॉड, राज्य राखीव दलाचा तुकडया, दंगा काबू पथक आदी यंत्रणा मंडणगडसह आंबडवे येथे उपलब्ध करण्यात आल्या होत्या.