अतिक्रमणसह विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात रनपकडून कारवाईची मोहीम

रत्नागिरी:- शहरातील रस्ते आणि फुटपाथवर असलेले अतिक्रमण आणि शहरात विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात रनपच्या पथकाने कारवाईची जोरदार मोहीम हाती घेतली. गुरुवारी प्रत्येकी पाच-पाच जणांवर कारवाई करण्यात आली असून पाच हजाराचा दंड जमा करण्यात आला. 

शहरातील रस्ते आणि फुटपाथवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण फोफावले आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्ते आणि फुटपाथवर भाजी आणि फळांची मोठया प्रमाणावर दुकाने थाटण्यात आली. अनधिकृत हातगाडी आणि फेरीवाल्यांची संख्या देखील मोठ्या संख्येने वाढली. या विरोधात नागरिकांच्या वाढत्या तक्रारी असल्याने गुरुवारी रनपचे अतिक्रमण हटाव पथक पुन्हा कार्यरत झाले.

गुरुवारी जयस्तंभ ते साळवी स्टॉप आणि साळवी स्टॉप ते रामआळीचा संपूर्ण परिसर अतिक्रमण हटाव पथकाने पिंजून काढला. यावेळी पाच हातगाडीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. या पाच जणांकडून प्रत्येकी पाचशे प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. याशिवाय ज्या दुकानदारांचे रस्ता आणि फुटपाथवर सामान होते अशा दुकानदारांना कडक शब्दात समज देण्यात आली. गुरुवारी दुपारपर्यंत ही कारवाई करण्यात आली असून सोमवार नंतर कारवाई करताना कठोर निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

अतिक्रमण हटावसह गुरुवारी शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर देखील कारवाईचा बडगा उगरण्यात आला. शहरात पाच जणांवर कारवाई करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिरताना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र अनेकजण या नियमाचे उल्लंघन करताना दिसून येतात. अशा पाच जणांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. या पाच जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला.