रत्नागिरी : रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना येथील समुद्रकिनारी उतरण्याचा मोह आवरत नाही. मात्र अनेकदा समुद्रकिनारी केला जाणारा अतिउत्साहीपणा पर्यटकांच्या अंगलट आल्याचा घटना वारंवार घडल्या आहेत. असाच एक प्रकार बुधवारी सकाळी सात वाजता भाट्ये किनारी घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये समुद्रकिनारी घडलेला हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. पर्यटकांची स्कॉर्पिओ बुधवारी सकाळी भाट्ये समुद्र किनाऱ्यावरील वाळूत रुतली. गाडी बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. भरतीच्या पाण्यामुळे गाडी बाहेर काढण्यात मोठे अडथळे येत होते.
भाट्ये किनारी गाडी घेऊन आलेल्या पर्यटकांनी गाडी थेट पाण्यात घातली. ओहोटीच्या पाण्यासोबत गाडी वाळूत रुतली. गाडी वाळूत रुतल्यानंतर मात्र पर्यटकांना घाम फुटला. अखेर स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली. जेसीबीच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली.