टेरव येथील स्वामी महिला स्वयंसहायता समुहाच्या महिलांचा सहभाग
रत्नागिरी:- बहिण-भावाच्या नात्याचा रक्षाबंधनाचा पवित्र सण घरोघरी साजरा झाला. यानिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील काही महाविद्यालये, महिला मंडळांच्यावतीने देशाच्या सिमेच्या रक्षणासाठी उभ्या ठाकणार्या जवानांसाठी राख्या पाठवल्या. रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूण तालुक्यातील टेरव गावामधील स्वामी महिला स्वयंसहायता समुहाच्या महिलांना भारत-पाकिस्ताथ सिमेवरील अटारी बॉर्डरवर जाऊन जवानांना प्रत्यक्ष रक्षाबंधन करीत हा उत्सव साजरा केला.
श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यावेळी नारळी पौर्णिमाही साजरी करण्यात आली. एकाच दिवशी दोन्ही सण येत असल्याने, रत्नागिरी जिल्ह्यात नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
बहिणभावाच्या उत्कट प्रेमाची आठवण करुन देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधनाचा सण आहे. भावाच्या मनगठावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी बहिणी प्रार्थना करतात तर बहिणींना त्यांचे भाऊ त्यांच्या रक्षणाची एकप्रकारे हमीच देत असतात.
सख्खा भावांप्रमाणेच सिमेवर देशाचे व नागरिकांचे रक्षण करणार्या जवानांप्रतीही भारतीय महिलांनी आदर व्यक्त करीत राख्या पाठवल्या. रत्नागिरी जिल्ह्यामधूनही महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थिनी, बचत गटांच्या महिलांनी आपल्या सिमेवरील जवानांनासाठी राख्या पाठवून, त्यांच्याप्रती असणारे प्रेम व्यक्त केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामधील टेरव येथील स्वामी महिला स्वयंसहायता समुहाच्या मानसी कदम, सायली सुर्वे, स्वप्नाली कराडकर, रुपाली कदम, रश्मी काणेकर, सुवर्णा पवार, ऐश्वर्या सागवेकर, मोहिनी पांचाळ, श्रेया साळवी, विमल शिंदे, सिध्दी सागवेकर, गणेशा कानेकर यांनी पुणे येथील संस्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून भारत-पाकिस्तान सिमेवरील अटारी बॉर्डर येथे जाऊन जवानांना राख्या बांधल्या. यावेळी सर्व भारतीय महिला या सिमेवरील जवान बांधवांच्या पाठीशी असल्याचे त्यांना आश्वस्त केले.